Asia Cup 2022: यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेमध्ये सुपर-४ फेरीत भारत आणि श्रीलंका यांच्यातील चढाओढीत श्रीलंकेने ६ गडी राखून विजय मिळवला. भारताने फलंदाजीने सुरुवात करून श्रीलंकेसमोर विजयासाठी १७४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केल्यामुळे श्रीलंकेने ही आव्हान आरामात पूर्ण केले. भारताकडून रोहित शर्मा व रविचंद्रन आश्विन यांची खेळी दमदार ठरल्याने भारतीय चाहत्यांना विजयाच्या अपेक्षा होत्या पण श्रीलंकेच्या निसंका आणि मेंडिस या जोडीने अर्धशतकी खेळी खेळत विजयासाठी मोठे योगदान दिले. भारताच्या पराभवाने आता आशिया चषकातील आव्हान संपुष्टात आले आहे का असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर ही बदललेली समीकरणं समजून घ्या.

सुपर-४ फेरीत भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात सामने खेळवले जात आहेत. या फेरीमध्ये हे चारही संघ एकदा एकमेकांसमोर येणार आहेत. भारताने या फेरीतील दोन सामने गमावले आहेत. मात्र अजूनही भारत पूर्णपणे स्पर्धेच्या बाहेर गेलेला नाही. ८ सप्टेंबर रोजी अफागणिस्ताविरोधात भारताची लढत होणार आहे.

सर्वप्रथम, अफगाणिस्तानच्या संघाने बुधवारी पाकिस्तानच्या संघावर मात करणे गरजेचे आहे त्यानंतर, चांगला नेट रन रेट आहे याची खात्री करण्यासाठी भारताला गुरुवारी अफगाणिस्तानवर मोठ्या फरकाने प्रबळ विजय नोंदवावा लागेल.

IND vs SL: रोहित शर्माच्या षटकाराने श्रीलंकेलाच नव्हे सुरक्षा रक्षकालाही झोडपलं, Video झाला व्हायरल

तसेच श्रीलंका संघाने त्यांच्या अंतिम सुपर ४ टप्प्यातील सामन्यात पाकिस्तान संघाचा पराभव करावा लागेल. यानंतर श्रीलंका ६ गुणांचा टप्पा गाठेल आणि भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे प्रत्येकी २ गुण असतील. टायब्रेक ठरवण्यासाठी नेट रन रेट लागू होईल आणि सर्वोत्कृष्ट रेट असलेला संघ सर्व प्रथम पात्र ठरेल,

भारताने जर नेट-रन रेट उत्तम ठेवून विजय मिळवला आणि पुढील सामन्यांमध्ये पाकिस्तानचा पराभव झाला तर भारताला अंतिम फेरीत जाण्याची संधी मिळू शकते. उद्या ७ सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामना होणार आहे. पाकिस्तानचे दोन सामने बाकी आहेत, जे श्रीलंका आणि अफगाणिस्तानसोबत होतील.

दरम्यान, सुपर-४ फेरीमध्ये गुणतालिकेतील अव्वल दोन संघांमध्ये अंतिम सामना खेळावला जाणार आहे. ११ सप्टेंबरला दुबईत आशिया चषकाचा अंतिम सामना होणार आहे. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी पाकिस्तानला एका विजयाची गरज आहे, तर भारताला अफगाणिस्तानला हरवून मग इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागणार आहे.