शनिवारपासून (२७ ऑगस्ट) आशिया चषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तान संघाने दणदणीत विजय मिळवत श्रीलंका संघाला धूळ चारली. श्रीलंकेने दिलेल्या १०६ धावांचे लक्ष्य अफगाणिस्तान संघाने अवघी दहा षटके आणि एका चेंडूत पूर्ण केले. फगाणिस्तानने श्रीलंकेवर आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवला.

हजरतुल्ला जझाई- रहमानउल्ला गुरबाज जोडीने विजय सुकर करून दिला

श्रीलंकेने दिलेल्या १०६ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी आलेल्या हजरतुल्ला जझाई- रहमानउल्ला गुरबाज या जोडीने धडाकेबाज फलंदाजी केली. हजरतुल्ला जझाई याने २८ चेंडूंमध्ये ३७ धावा करत नाबाद खेळी केली. तर गुरबाज याने अवघ्या १८ चेंडूमध्ये ४० धावा करत संघाला विजय सुकर करून दिला. इब्राहीम झरदान (१५) नजीबउल्ला झरदान (२, नाबाद) यांनी संघाला विजय मिळवून दिला.

अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी केली कमाल

या विजयासाठी अफगाणीस्तानच्या गोलंदाजांनीही मोलाची कामगिरी केली. अफगाणिस्तानच्या फझलहक फारुकीने तीन विकेट्स घेत फक्त ११ धावा दिल्या. त्यानंतर नवीन उल हकने एक विकेट घेत संघाला मजबूत स्थितीत आणण्यास मदत केली. तर मुजीबनेही दोन विकेट्स घेत फारुकीसोबत श्रीलंकेच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. कर्णधार मोहम्मद नबी यानेदेखील १४ धावा देत दोन गडी बाद केले.

श्रीलंकेच्या फलंदाजांचा खराब खेळ

सलामीला आलेल्या पाथुम निसांका (३)-कुशल मेंडिस (२) जोडीने निराशा केली. तर दुसऱ्या विकेटसाठी आलेला असलंका शून्यावर बाद झाला. त्यानंतर गुनाथिलका (१७) आणि भानुका राजपक्षे (३८) यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र तेदेखील मैदानात जास्त काळ तग धरू शकले नाही. पाचव्या विकेटसाठी आलेल्या हसरंगानेही निराशा केली. तो अवघ्या दोन धावा करू शकला. तर कर्णधार शनाका संघाला सावरेल अशी आशा होती. मात्र तो खातंदेखील खोलू शकला नाही. त्यानंतर करुणारत्नेने ३१ धावा करत संघासाठी मोठे योगदान दिले. त्याच्या खेळीमुळेच संघ १०५ धावांपर्यंत पोहोचू शकला. शेवटच्या फळीतील माहीश थिक्षाना (०) दिलशान मदुशंका (१), मथिशा पाथिराना (५) यांनी अवघ्या सहा धावा केल्या.