रविवारी दुबईत महिला आशिया चषक स्पर्धेचा फायनलचा मुकाबला रंगला. भारतीय संघाने दमदार कामगिरी करत श्रीलंकेला नमवलं. भारतीय संघाचं या स्पर्धेचं हे आठवं जेतेपद आहे. मात्र भारतीय संघाने जेतेपदाचा करंडक स्वीकारला नाही. आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख मोहसीन नक्वी हे पाकिस्तानचे आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यातील दुरावलेल्या संबंधामुळे भारतीय संघाने नक्वी यांच्या हस्ते जेतेपद स्वीकारण्यास नकार दिला. आशिया चषकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा वाद उफाळून आला.

१९८६- भारताची स्पर्धेतून माघार

भारताने श्रीलंकेतल्या अंतर्गत सुरक्षेच्या कारणास्तव आशिया चषकासाठी संघ पाठवण्यास नकार दिला होता. श्रीलंकेने घरच्या मैदानावर चांगली कामगिरी करत जेतेपद पटकावलं.

१९९०- पाकिस्तानने नाही पाठवला संघ

भारतात आयोजित आशिया चषकात पाकिस्तानने संघ पाठवला नाही. दोन्ही देशांदरम्यानच्या दुरावलेल्या संबंधामुळे पाकिस्तानने हा निर्णय घेतला. भारताने त्यावर्षी जेतेपद पटकावलं.

२०१०- हरभजन शोएब बाचाबाची

आशिया चषकाच्या फायनलदरम्यान भारताचा हरभजन सिंग आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. हरभजनने चौकारासह भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. सामना, पुरस्कार वितरण सोहळा झाल्यानंतरही हे प्रकरण शांत झालं नाही. हरभजनला मारण्यासाठी गेलो होतो असा दावा शोएबने केला होता. मात्र पुढे या दोघांनी भांडण मिटवलं.

२०१०- गंभीर कामरान भिडले

भारताचा धडाकेबाज सलामीवीर गौतम गंभीर आणि पाकिस्तानचा विकेटकीपर फलंदाज कामरान अकमल यांच्यात बाचाबाची झाली. दोघं एकमेकांवर चाल करून गेले. पंचांना हस्तक्षेप करावा लागला. गैरसमजातून हा प्रकार घडला असं कामरानने नंतर सांगितलं.

२०१६ धोनीचा तो फोटो आणि बांगलादेशच्या चाहत्यांवर टीका

भारत आणि बांगलादेश यांच्यातील फायनलपूर्वी महेंद्रसिंग धोनीचा एक फोटो व्हायरल झाला. बांगलादेशचा तास्किन अहमद आणि बाकी गोलंदाजांच्या हाती धोनीचं मुंडण केलेलं डोकं असा तो फोटो होता. आक्षेपार्ह अशा फोटोमुळे बांगलादेशच्या चाहत्यांवर जोरदार टीका झाली.

२०२२ असिफ अली आणि फरीद अहमद आमनेसामने

पाकिस्तानच्या असिफ अली आणि अफगाणिस्तानच्या फरीद अहमद यांच्यात वादावादी झाली. फरीद असिफला बाद केल्याचा आनंद व्यक्त करत होता. ते न आवडल्याने असिफने फरीदला ढकललं. पंच आणि बाकी खेळाडूंनी दोघांना शांत केलं. सामनाधिकाऱ्यांनी दोघांना २५ टक्के दंड ठोठावला.

२०२५ सूर्यकुमार आणि टीम इंडियाचा हँडशेकला नकार

भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉसवेळी पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली अघाशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. सामना संपल्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केलं नाही. भारताच्या भूमिकेवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने टीका केली.

२०२५ भारताने मोहसीन नक्वींच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास दिला नकार

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने आशिया चषकाचं जेतेपद पटकावलं. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते विजेत्या भारतीय संघाला जेतेपद मिळणं अपेक्षित होतं. मात्र पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध दुरावले आहेत. भारतीय संघाने पाकिस्तानच्या नक्वी यांच्या हस्ते जेतेपद स्वीकारण्यास नकार दिला. सामना संपल्यानंतर दीड तास यासंदर्भात गोंधळ सुरू होता. आयोजक युएई बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते जेतेपद देता येईल का यासंदर्भात पर्याय चाचपडण्यात आले. जेतेपद देण्यावर नक्वी ठाम राहिले. भारतीय संघ जेतेपदाच्या करंडकाविना मायदेशी परतला. जेतेपदाचा करंडक अद्यापही भारतीय संघाला मिळालेला नाही.

२०२६ पुन्हा एकदा नक्वी, जेतेपद स्वीकारण्यास दिला नकार

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारतीय संघाने आशिया चषकाचं जेतेपद जिंकलं. मात्र पुन्हा एकदा मोहसीन नक्वी यांच्या हस्ते जेतेपद स्वीकारण्यास भारतीय संघाने नकार दिला. सामना संपल्यानंतर पाऊण तासाने पुरस्कार वितरण सोहळा सुरू झाला. श्रीलंका संघ आणि सामनाधिकारी पंच यांना गौरवण्यात आलं. यानंतर भारतीय संघातील खेळाडूंना पदकं तसंच जेतेपदाने सन्मानित करणं अपेक्षित होतं. मात्र सूत्रसंचालक परवेझ महारुफ यांनी पुरस्कार सोहळा संपल्याचं जाहीर केलं. त्यावेळी भारतीय संघाने जेतेपद स्वीकारण्यास नकार दिला का? याविषयी कोणीच भूमिका स्पष्ट केली नाही. बीसीसीआयचे सचिव देवजीत साईकिया सामन्याला उपस्थित होते. त्यांनी थोड्या वेळानंतर भूमिका स्पष्ट केली. पाकिस्तानच्या नक्वी यांच्या हस्ते जेतेपद स्वीकारणार नाही ही आमची भूमिका आहे. प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनीही सांगितलं की बीसीसीआयने भूमिका घेतली आहे, आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. आम्ही सामना जिंकलो, जेतेपद पटकावलं. आमच्यासाठी स्पर्धा संपली. मोहसीन नक्वी पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित होते. मात्र सोहळा संपल्यानंतर ते ट्रॉफीसह जाताना दिसले नाहीत.