पीटीआय, दुबई : पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर सरशी साधल्यानंतर भारतीय संघ आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज झाला असून बुधवारी त्यांची तुलनेने दुबळय़ा हाँगकाँगशी लढत होणार आहे. या सामन्यात सलामीवीर केएल राहुलला लयीत परतण्याची सुवर्णसंधी मिळेल. अ-गटातील या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाकडून चाहत्यांना मोठय़ा विजयाची अपेक्षा आहे. भारताने सलामीच्या लढतीत पाकिस्तानवर अखेरच्या षटकात विजय मिळवला. आता हाँगकाँगविरुद्ध अधिक वर्चस्वपूर्ण कामगिरीचा त्यांचा प्रयत्न असेल.

पात्रता फेरीतील सर्वोत्तम कामगिरीच्या बळावर हाँगकाँगचा संघ आशिया चषकाच्या मुख्य फेरीसाठी पात्र ठरला. मात्र, त्यांना भारत आणि पाकिस्तान या बलाढय़ संघांविरुद्ध साखळी सामने खेळावे लागणार असल्याने हा संघ आगेकूच करेल याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे भारतीय संघ हाँगकाँगविरुद्धच्या सामन्याकडे खेळांमधील उणिवा दूर करण्याची नामी संधी म्हणून पाहू शकेल.

विशेषत: उपकर्णधार राहुल खेळपट्टीवर अधिक वेळ घालवण्यासाठी उत्सुक असेल. ‘आयपीएल’च्या गेल्या हंगामादरम्यान झालेली दुखापत आणि त्यानंतर करोनाची बाधा झाल्याने राहुलला बराच काळ मैदानाबाहेर राहावे लागले. त्यानंतर त्याने झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघात पुनरागमन केले. पण त्याला फारशा धावा करता आल्या नाहीत. आशिया चषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. मात्र, आता हाँगकाँगविरुद्ध त्याचा मोठी खेळी करण्याचा प्रयत्न असेल. राहुलला सूर गवसल्यास ‘अव्वल चार’ फेरी आणि त्यानंतरच्या सामन्यांपूर्वी भारतीय संघाला अधिक बळकटी मिळेल.

रोहित, विराट कामगिरी उंचावणार?

गेल्या काही काळापासून भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीविषयी बरीच चर्चा केली जात आहे. विराटला जवळपास तीन वर्षांत एकही शतक करता न आल्याने त्याच्यावर दडपण आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराटने ३५ धावांची खेळी केली, पण त्यासाठी ३४ चेंडू घेतले. त्यामुळे त्याचा मोठी खेळी करतानाच धावांची गती वाढवण्याचाही प्रयत्न असेल. कर्णधार रोहितला सलामीच्या लढतीत १८ चेंडूंत १२ धावाच करता आल्या. त्यामुळे विराटप्रमाणेच रोहितचा कामगिरी उंचावण्याचा मानस असेल. तसेच अखेरच्या षटकांत सूर्यकुमार यादव, हार्दिक पंडय़ा, दिनेश कार्तिक आणि रवींद्र जडेजा हे फटकेबाजी करण्यासाठी उत्सुक असतील.

अनुभवी अश्विनला संधी?

सलामीच्या लढतीत पाकिस्तानचे दहाही फलंदाज भारताच्या वेगवान गोलंदाजांनी बाद केले. भुवनेश्वर कुमार (४/२६) आणि हार्दिक (३/२५) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांना अर्शदीप सिंग (२/३३) आणि आवेश खान (१/१९) या युवकांची उत्तम साथ लाभली. यजुर्वेद्र चहल आणि जडेजा या फिरकी जोडीला मात्र फारसा प्रभाव पाडता आला नाही. त्यामुळे हाँगकाँगविरुद्ध अनुभवी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनला संधी देण्याचा भारतीय संघ विचार करू शकेल. तसेच भारताकडे युवा लेग-स्पिनर रवी बिश्नोईचा पर्यायही उपलब्ध आहे.

संघ

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), दीपक हुडा, हार्दिक पंडय़ा, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, यजुर्वेद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.

हाँगकाँग : निझाकत खान (कर्णधार), किंचित शाह, आफताब हुसेन, एजाज खान, अतीक इक्बाल, बाबर हयात, धनंजय राव, एहसान खान, हरून अर्शद, स्कॉट मॅकेनी, गझनफर मोहम्मद, मोहम्मद वाहीद, आयुष शुक्ला, अहान त्रिवेदी, वाजिद शाह, यासिम मुर्तझा, झीशान अली.

  • वेळ : सायं. ७.३० वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी