पीटीआय, सिल्हेट : सलामीवीर शफाली वर्माच्या (२८ चेंडूंत ४२ धावा) आक्रमक फलंदाजीनंतर दीप्ती शर्माने (७ धावांत ३ बळी) केलेल्या भेदक माऱ्यामुळे भारतीय महिला संघाने गुरुवारी थायलंडवर ७४ धावांनी विजय मिळवत विक्रमी आठव्यांदा आशिया चषक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. भारताने सहा वेळा या स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहे.

उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १४८ अशी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात थायलंडला २० षटकांत ९ बाद ७४ अशा धावसंख्येपर्यंतच पोहोचता आले. थायलंडने ठरावीक अंतराने गडी गमावले. साखळी फेरीतील सामन्याच्या तुलनेत थायलंडच्या संघाने यावेळी चांगली कामगिरी केली. थायलंडचे चार गडी २१ धावांवर माघारी परतले. त्यानंतर कर्णधार एन. चाइवाइ (२१) आणि नत्ताया बूचाथम (२१) यांनी काहीशी झुंज दिली. मात्र, त्यांना इतरांची साथ लाभली नाही. भारताकडून फिरकी गोलंदाज दीप्ती शर्माने थायलंडचे पहिले तिन्ही बळी मिळवले. यासह राजेश्वरी गायकवाडने दोन, तर शफाली व स्नेह राणाने एक-एक गडी बाद केला.

त्यापूर्वी, भारताची युवा सलामीवीर शफालीची फटकेबाजी रोखण्यासाठी थायलंडच्या गोलंदाजांना बरेच प्रयत्न करावे लागले. शफालीने २८ चेंडूंत ४२ धावांची खेळी करताना पाच चौकार आणि एक षटकार मारला. जेमिमा रॉड्रिग्जने २७ धावांची खेळी करीत शफालीला उत्तम साथ दिली. दुखापतीमुळे गेल्या दोन सामन्यांना मुकलेल्या कर्णधार हरमनप्रीत कौरने ३० चेंडूंत ३६ धावांचे योगदान दिले. तसेच पूजा वस्त्रकारने १३ चेंडूंत १७ धावा करीत भारताची धावसंख्या १४०च्या पुढे नेण्यात हातभार लावला.

श्रीलंकेची पाकिस्तानवर सरशी

श्रीलंकेच्या महिला संघाने चुरशीच्या झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानवर एका धावेने विजय नोंदवत आशिया चषक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने निर्धारित २० षटकांत ६ बाद १२२ धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानने निर्णायक क्षणी गडी गमावले. अखेरच्या चेंडूवर तीन धावांची आवश्यकता असताना पाकिस्तानच्या फलंदाज एक धाव करू शकल्या. त्यामुळे पाकिस्तानचा डाव २० षटकांत ६ बाद १२१ धावांवर मर्यादित राहिला.

संक्षिप्त धावफलक 

भारत : २० षटकांत ६ बाद १४८ (शफाली वर्मा ४२, हरमनप्रीत कौर ३६; सोरन्नारिन टिप्पोच ३/२४) विजयी वि. थायलंड : २० षटकांत ९ बाद ७४ (एन. चाइवाइ २१, नत्ताया बूचाथम २१; दीप्ती शर्मा ३/७, राजेश्वरी गायकवाड २/१०)