पीटीआय, सिल्हेट (बांगलादेश) : भारतीय महिला संघाचे आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेतील वर्चस्वपूर्ण कामगिरी सुरू ठेवण्याचे लक्ष्य असून शुक्रवारी त्यांच्यापुढे पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचे आव्हान असेल. भारतीय संघाने यंदाच्या आशिया चषकात उत्कृष्ट कामगिरी करताना सलग तीन सामन्यांत विजय नोंदवले आहेत. गेल्या दोन सामन्यांत (मलेशिया आणि संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध) भारतीय संघाने युवा खेळाडूंना अधिक संधी दिली. मात्र, पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघ आपल्या सर्वोत्तम खेळाडूंसह मैदानात उतरणे अपेक्षित आहे.

भारत आणि पाकिस्तान हे संघ सध्या आशिया चषकाच्या गुणतालिकेत अव्वल दोन स्थानांवर आहेत. मात्र, या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात आहे. या दोन देशांच्या महिला संघांतील गेल्या काही सामन्यांत भारताने वर्चस्व गाजवले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तानचा आठ गडी राखून पराभव केला होता. या दोन संघांतील गेले पाचही ट्वेन्टी-२० सामने भारताने जिंकले आहेत. 

भारताच्या फलंदाजीची भिस्त सलामीवीर स्मृती मानधना, कर्णधार हरमनप्रीत कौर आणि मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्जवर असेल. जेमिमाने या स्पर्धेत दोन अर्धशतके झळकावली आहेत. अमिरातीविरुद्धच्या गेल्या सामन्यात दीप्ती शर्माने अर्धशतकी खेळी करत जेमिमाला उत्तम साथ दिली. या दोघींची कामगिरी भारतासाठी पुन्हा महत्त्वाची ठरेल. तसेच सलामीवीर शफाली वर्माकडून भारताला आक्रमक सलामीची अपेक्षा आहे. भारताच्या गोलंदाजीची मदार रेणुका ठाकूर, पूजा वस्त्रकार, दीप्ती शर्मा आणि स्नेह राणा यांच्यावर आहे.

थायलंडकडून पाकिस्तानला धक्का

थायलंड महिला संघाने आशिया चषक स्पर्धेत गुरुवारी पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला. थायलंडने हा सामना ४ गडी आणि १ चेंडू राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानचा डाव २० षटकांत ५ बाद ११६ धावांवर मर्यादित राहिला. सिद्रा अमीनने (५६) एकाकी झुंज दिली. थायलंडने ११७ धावांचे लक्ष्य १९.५ षटकांत गाठत ऐतिहासिक विजय नोंदवला. थायलंडची सलामीवीर नथ्थाकन चँथमने ६१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली.

  • वेळ : दु. १ वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २