जकार्ता : सलामीच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्धच्या बरोबरीनंतर पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला मंगळवारी दुसऱ्या सामन्यात जपानकडून २-५ अशा मोठय़ा फरकाने पराभव पत्करावा लागला. त्यामुळे या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारताचा मार्ग आता खडतर झाला आहे.

मंगळवारी झालेल्या अ-गटातील साखळी सामन्यात जपानकडून कोसेइ कवाबेने (४० आणि ५६वे मिनिट) दोन, तर केन नागायोशी (२४वे मि.), उका रयोमा (४९वे मि.) आणि कोजी यामासाकी (५५वे मि.) यांनी प्रत्येकी एक गोल झळकावला. भारताचे दोन गोल पवन राजभर (४५वे मि.) आणि उत्तम सिंग (५०वे मि.) यांनी केले. 

भारताचा पुढील सामना २६ मे रोजी इंडोनेशियाशी होणार आहे. बाद फेरीच्या आशा कायम राखण्यासाठी भारताला या सामन्यात विजय अनिवार्य असून त्यांना अन्य निकालांवरही अवलंबून राहावे लागेल.