काकामिघारा : भारतीय महिला हॉकी संघाने कनिष्ठ गट आशिया चषक स्पर्धेत धडाक्यात सुरुवात केली. सलामीच्या सामन्यात शनिवारी भारतीय संघाने अन्नुच्या दुहेरी हॅट्ट्रिकच्या जोरावर उझबेकिस्तानचा २२-० असा धुव्वा उडवला.
भारताकडून अन्नुने (१३, २९, ३०, ३८, ४३ आणि ५१व्या मिनिटाला) तब्बल सहा गोल केले. अन्नुला मुमताज खान (६, ४४, ४७ व ६०व्या मि.) आणि दीपिका (३२, ४४, ४६ व ५७व्या मि.) यांनी प्रत्येकी चार, तर वैष्णवी फाळके (तिसऱ्या व ५६व्या मि.), सुनेलिता टोप्पो (१७ व १७व्या मि.), दीपिका सोरेंग (१८ व २६व्या मि.) यांनी प्रत्येकी दोन, तर मंजू चौरासिया (२६व्या मि.), नीलम (४७व्या मि.) यांनी एकेक गोल नोंदवून सुरेख साथ दिली.




पहिल्या दिवशी ६९ गोल
कनिष्ठ गटातील महिला आशिया चषक हॉकी स्पर्धेत पहिल्या दिवशी गोलचा अक्षरश: पाऊस पडला. भारताने २२ गोल करून विजय नोंदवण्यापूर्वी कोरियाने तैवानचा ५-१ असा पराभव केला. चीनने इंडोनेशियाचा १८-० आणि यजमान जपानने हाँगकाँगचा २३-० असा फडशा पाडला. उद्घाटनाच्या दिवशी तब्बल ६९ गोलची नोंद झाली.