आशिया चषक हॉकी स्पर्धा : भारतीय महिलांना कांस्यपदक

भारताने सुरुवातीपासून सामन्यावर पकड मिळवत पहिल्या सत्रात दोन पेनल्टी कॉर्नर मिळवले.

मस्कत : गतविजेत्या भारताने शुक्रवारी चीनवर २-० असा विजय मिळवून महिला आशिया चषक हॉकी स्पर्धेचे कांस्यपदक पटकावले.

उपांत्य फेरीत कोरियाकडून पत्करलेल्या पराभवातून सावरत भारतीय संघाने नियंत्रित खेळ केला. पहिल्या दोन सत्रांत एकेक गोल करीत भारताने मध्यंतरालाच २-० अशी आघाडी मिळवली. उर्वरित दोन सत्रांत भारतीय संघ गोल नोंदवण्यात अपयशी ठरला.

भारताने सुरुवातीपासून सामन्यावर पकड मिळवत पहिल्या सत्रात दोन पेनल्टी कॉर्नर मिळवले. १३व्या मिनिटाला गुर्जित कौरने मारलेला फटका चिनी बचावाने अडवल्यानंतर शर्मिला देवीने पुनप्र्रयत्नात गोल साकारला. दुसऱ्या सत्रातही भारताने चीनच्या बचावावर दडपण आणत १९व्या मिनिटाला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळवला. गुर्जितने अप्रतिम ड्रॅग-फ्लिक करीत आघाडी २-० अशी वाढवली. चीनचा एका पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न भारताची कर्णधार आणि गोलरक्षक सविता पुनियाने हाणून पाडला.

उपांत्य फेरीत कोरियाकडून २-३ असा पराभव पत्करल्याने भारत जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Asia cup hockey tournament bronze medal for indian women akp

Next Story
युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : भारताला पराभवाची परतफेड करण्याची संधी
फोटो गॅलरी