पीटीआय, जकार्ता : राखेतून पुन्हा झेप घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भारतीय पुरुष संघाने गुरुवारी कामगिरी उंचावताना इंडोनेशियाला तब्बल १६-० अशा फरकाने धूळ चारली आणि ‘अव्वल ४’ संघांमध्ये स्थान मिळवले. शनिवारी आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत पुन्हा जपानशी सामना करताना पराभवाचा वचपा काढण्याचा निर्धार भारतीय संघाने केला आहे.

अखेरच्या साखळी लढतीत दुबळय़ा इंडोनेशियाविरुद्ध सरदार सिंगच्या मार्गदर्शनाखाली युवा भारतीय संघाने लक्षवेधी कामगिरी केली. भारताने पाकिस्तानची स्पर्धेतीलच नव्हे, तर विश्वचषकाचीही वाटचाल खंडित केली. परंतु पहिल्या दोन सामन्यांत भारताची कामगिरी अपेक्षित झाली नव्हती. पाकिस्तानविरुद्ध पहिल्या सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली, तर जपानकडून २-५ असा पराभव पत्करल्याने भारताचे आव्हान धोक्यात आले.

अनुभवी ड्रॅग-फ्लिकर रुपिंदरपाल सिंग आणि अमित रोहिदास यांचा संघात समावेश नसल्याने भारताची पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करण्याची टक्केवारी चिंताजनक आहे. इंडोनेशियाविरुद्धच्या सामन्यात भारताला मिळालेल्या २२ पैकी फक्त ९ पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करता आले होते. दिपसन तिर्कीने पाच गोल केले.

  •   वेळ : सायं. ५ वा.
  •   थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट २