जकार्ता : सामना संपायला एक मिनिट बाकी असताना पाकिस्तानकडून नोंदवलेल्या गोलमुळे भारताचा विजय निसटला. त्यामुळे आशिया चषक पुरुषांच्या हॉकी स्पर्धेतील अ-गटातील पहिल्या सामन्यात सोमवारी पाकिस्तानला भारताशी १-१ अशी बरोबरी राखता आली.

२० वर्षीय कार्ती सेल्वमने पदार्पणात पहिल्या सत्राच्या नवव्या मिनिटाला भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. परंतु ५९व्या मिनिटाला अब्दुल राणाने पेनल्टी कॉर्नरद्वारे पाकिस्तानला बरोबरी साधून दिली. भारताचा पुढील सामना मंगळवारी जपानशी होणार आहे.

सामन्याच्या तिसऱ्या मिनिटाला  गोल करण्याची पाकिस्तानला पहिली संधी मिळाली होती. परंतु ते अपयशी ठरले. पण काही सेकंदांनंतर भारतालाही पेनल्टी कॉर्नर मिळाला. परंतु नीलम संजीप झेसने मारलेला फटका पाकिस्तानचा गोलरक्षक अकमल हुसेनने अडवला. त्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानच्या बचावावर दडपण आणण्याचे प्रयत्न केले. पहिल्या सत्रात भारताला आणखी दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. त्यातील दुसऱ्या पेनल्टी कॉर्नरवर कार्तीने गोल करत भारताचे खाते उघडले.

दुसऱ्या सत्रात भारतीय खेळाडूंनी चेंडूवर उत्तम नियंत्रण राखले. तिसऱ्या सत्रातही भारताने पाकिस्तानच्या बचावफळीवरील दबाव कायम ठेवला होता. यात भारताला सातवा पेनल्टी कॉर्नर मिळाला. परंतु त्याचे गोलमध्ये रूपांतरण करण्यात अपयश आले. चौथ्या आणि शेवटच्या सत्रात भारतीय संघाने सावध पवित्रा घेत वेळ दवडण्याचा प्रयत्न केला. त्यातच भारतीय बचावाकडून चूक झाली. ५९व्या मिनिटाल मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर राणाने गोल करुन पाकिस्तानला १-१ अशी बरोबरी साधून दिली.