आशिया चषक हॉकी स्पर्धा : भारताची लक्षवेधी मुसंडी; इंडोनेशियाचा १६-० असा धुव्वा; दिपसनचे पाच गोल; पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात

परिस्थितीनुरूप खेळ उंचावत युवा भारतीय पुरुष हॉकी संघाने गुरुवारी अखेरच्या साखळी लढतीत इंडोनेशियाचा १६-० असा धुव्वा उडवत आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या ‘अव्वल-४’ स्तरापर्यंत मुसंडी मारली.

पीटीआय, जकार्ता : परिस्थितीनुरूप खेळ उंचावत युवा भारतीय पुरुष हॉकी संघाने गुरुवारी अखेरच्या साखळी लढतीत इंडोनेशियाचा १६-० असा धुव्वा उडवत आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत (अव्वल-४) मुसंडी मारली. भारताने सामन्याच्या अखेरच्या सत्रात सहा गोल नोंदवण्याचा पराक्रम दाखवला.

या दिमाखदार विजयामुळे गतविजेत्या भारताने फक्त आगेकूच केली नाही, तर परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचे आव्हानसुद्धा संपुष्टात आणले.  अ-गटातून जपानने ९ गुणांसह गटविजेत्याच्या थाटात पुढील फेरी गाठली. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांच्या खात्यावर समान चार गुण जमा होते; परंतु सरस गोलफरकाआधारे (१) भारताने पाकिस्तानला मागे टाकले.

जपानकडून पाकिस्तानने २-३ असा निसटता पराभव पत्करल्यामुळे भारताला पुढील फेरी गाठण्यासाठी १५-० असा विजय मिळवणे आवश्यक होते. दिपसन तिर्कीने पाच गोल आणि सुदेव बेलिमागान तीन गोल करीत भारताच्या वाटचालीत सिंहाचा वाटा उचलला. अनुभवी एसव्ही सुनील, पवन राजभर आणि कार्ती सेल्व्हम यांनी प्रत्येकी दोन गोल केले, तर उत्तम सिंग व नीलम संजीप एक्सेस यांनी प्रत्येकी एकेक गोल केला.

भारताने आक्रमक पद्धतीने सुरुवात केली; परंतु सातव्या मिनिटाला भारताचा गोलसाठीचा प्रयत्न अपयशी ठरला. मग १०व्या मिनिटाला राजभरने ताकदीच्या फटक्यानिशी भारताचे खाते उघडले. मग पुढच्याच मिनिटाला पहिल्या पेनल्टी कॉर्नरच्या बळावर भारताची आघाडी दुप्पट केली. १४व्या मिनिटाला उत्तमने भारताचा तिसरा गोल नोंदवला.

दुसऱ्या सत्रात १९व्या मिनिटाला सुनीलने भारताच्या आघाडीत भर घातली. पुढच्याच मिनिटाला आणखी एका पेनल्टी कॉर्नरचे नीलमने गोलमध्ये रूपांतरण केल्यामुळे गोलसंख्या पाच झाली. मग २४व्या मिनिटाला सुनीलने गोल करीत भारताची आघाडी ६-० अशी उंचावली. मध्यंतरानंतर भारताला सातवा पेनल्टी कॉर्नर मिळाला; परंतु इंडोनेशियाचा गोलरक्षक ज्युनियस रुमारोपनने त्यावर गोल होऊ दिला नाही. ४०व्या मिनिटाला राजभरने इंडोनेशियाच्या तीन-चार संरक्षकांना भेदत भारताचा सातवा गोल साकारला. त्यानंतर भारताला तीन सलग पेनल्टी कॉर्नर मिळाले. यापैकी अखेरच्या प्रयत्नात दिपसनने गोल करीत भारताच्या आशा जिवंत ठेवल्या. मग ४२व्या मिनिटाला दिपसनने पेनल्टी स्ट्रोकद्वारे आपला दुसरा गोल झळकावला. भारताला आणखी दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले; पण या दोन्ही प्रयत्नांत दिपसन अयशस्वी ठरला. सुदेवने मग लागोपाठच्या मिनिटाला गोल करीत भारतीय वर्चस्वाची ग्वाही दिली. दिपसनने ४७व्या मिनिटाला भारताला मिळालेल्या १४व्या पेनल्टी कॉर्नरच्या बळावर आपली हॅट्ट्रिक साकारत भारताची आघाडी १२-० अशी केली.

मग सामना संपण्यास पाच मिनिटे असताना सुदेवनेही पेनल्टी कॉर्नरद्वारे भारताचा १३वा गोल नोंदवला. पुढच्याच मिनिटाला कार्तीने मैदानी गोल केला. सामना संपायला एक मिनिट बाकी असताना दिपसनने दोन पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करीत १६-० अशा फरकासह भारताचे आव्हान शाबूत राखण्यात सिंहाचा वाटा उचलला. भारतासह जपान, मलेशिया आणि दक्षिण कोरिया यांनी दुसरी फेरी गाठली. भारताचा २८ मे रोजी जपानशी, २९ मे रोजी मलेशियाशी व ३१ मे रोजी कोरियाशी सामना होईल.

पाकिस्तानचे विश्वचषकाचे स्वप्न धुळीस

भारताने पाकिस्तानच्या विश्वचषकाच्या आशांपुढेही पूर्णविराम दिला. कारण या स्पर्धेतील फक्त अव्वल तीन संघ विश्वचषकासाठी पात्र ठरणार आहेत. पुढील वर्षी भारतात विश्वचषक हॉकी स्पर्धा होणार असल्याने युवा खेळाडूंना अजमावण्याचे धोरण भारताने आशिया चषक स्पर्धेत आखले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Asia cup hockey tournament indian hockey team indonesia beat pakistan challenge ysh

Next Story
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : अंतिम फेरीसाठी चुरस!; आज ‘क्वालिफायर-२’ सामन्यात राजस्थान-बंगळूरु आमनेसामने
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी