जकार्ता : भारतीय पुरुष हॉकी संघाने शनिवारी आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या ‘अव्वल-४’ स्तरावर दोन प्रेक्षणीय मैदानी गोल करीत जपानला २-१ असे नामोहरम केले. याचप्रमाणे साखळीत पत्करलेल्या पराभवाची परतफेडही केली. भारताच्या विजयात मनजीत (आठव्या मिनिटाला) आणि पवन राजभर (३५व्या मि.) यांनी योगदान दिले. जपानकडून एकमेव गोल तकुमा निवाने १८व्या मिनिटाला केला.

जपानने आक्रमक सुरुवात करीत पहिल्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवला. परंतु भारताने त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. नंतर सामन्यावर भारताने  पकड घट्ट केली. पवनच्या पासवर जपानचा गोलरक्षक ताकाशी योशिकावाला चकवत मनजीतने आठव्या मिनिटाला भारताला आघाडी मिळवून दिली. मग १३व्या मिनिटाला मिणदर सिंगमुळे भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. परंतु निलम एक्सेसचा प्रयत्न अयशस्वी झाला.

दुसऱ्या सत्रात १८व्या मिनिटाला  पेनल्टी कॉर्नरद्वारे केन नागायोशीचा पहिला प्रयत्न भारताचा गोलरक्षक सूरज करकेराने अडवला. स्टिकला लागून परतलेल्या चेंडूवर तकुमाने दुसऱ्या प्रयत्नात मात्र गोल साधला. काही मिनिटांनी कार्ती सेल्व्हमने गोल करण्याची संधी वाया दवडली. तिसऱ्या सत्रात पाचव्या मिनिटाला उत्तम सिंगच्या साहाय्यामुळे राजभरने भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. पाच मिनिटांनी जपानच्या आक्रमण फळीला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतरण करण्यात अपयश आले. सामना संपायला तीन मिनिटे बाकी असताना जपानला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण भारताने अप्रतिम बचाव करीत आघाडी टिकवून ठेवली.

आजचा सामना

भारत वि. मलेशिया

वेळ : सायं. ५ वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट २