विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ‘वीर’ रसाने प्रेरित झालेल्या भारतीय संघाने आशिया चषक स्पध्रेत झोकात सलामी नोंदवली. पाच वेळा आशियाई विजेतेपदाला गवसणी घालणारा भारतीय संघ मागील आठ सामन्यांत विजयापासून वंचित राहिला होता. पण बांगलादेशच्या भूमीवर ही मालिका खंडित झाली. आता विजयाचा हाच आवेश राखत शुक्रवारी श्रीलंकेविरुद्धचा पहिला कठीण पेपर भारताला द्यायचा आहे.
आशिया चषक क्रिकेट स्पध्रेच्या पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा सहा विकेट राखून पराभव केला. परंतु श्रीलंकेचा सामना करणे त्यांच्यासाठी इतके सोपे नसेल. श्रीलंकेने गतविजेत्या पाकिस्तानला १२ धावांनी हरवले आहे. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड भूमीवरील एकदिवसीय मालिकेत सपाटून मार खाणाऱ्या भारताने खान साहेब ओस्मान अली स्टेडियमवर बांगलादेशचे २८० धावांचे लक्ष्य लीलया पेलले. प्रभारी कर्णधार विराट कोहलीने १२२ चेंडूंत १३६ धावांची घणाघाती खेळी साकारली आणि अजिंक्य रहाणेसोबत २१३ धावांची बहुमोल भागीदारी उभारली. रहाणेने ७३ धावांचे योगदान दिले. बांगलादेशमध्ये कोहलीची फलंदाजी बहरते, याचा पुनप्र्रत्यय आला. त्याने १० सामन्यांत १२४च्या सरासरीने ८६८ धावा केल्या आहेत. मागील आशिया चषक स्पध्रेत कोहलीने आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम अशी १८३ धावांची खेळी साकारली होती. परदेशी भूमीवर भारतीय संघाची कामगिरी सध्याच्या घडीला चांगली होती नसली तरी भारत आशिया चषक स्पध्रेचा संभाव्य विजेता मानला जात आहे.
न्यूझीलंडविरुद्ध रहाणेने पाच सामन्यांत ५१ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताच्या मधल्या फळीला स्थर्य मिळाले नव्हते. परंतु श्रीलंका आणि पाकिस्तानशी सामना करण्यापूर्वी आता भारताची मधली फळी समर्थपणे वावरू लागली आहे. आता भारताचे अंतिम फेरीतील भवितव्य पुढील दोन महत्त्वाच्या सामन्यांवर अवलंबून आहे. बांगलादेशच्या माऱ्याविरुद्ध शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी अर्धशतकी सलामी दिली.
श्रीलंकेच्या वेगवान माऱ्याची धुरा असेल ती लसिथ मलिंगावर. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने पाच बळी घेण्याची किमया साधली होती. त्यामुळे दमदार सलामी देण्यासाठी रोहित-शिखर उत्सुक आहेत. धवनच्या फलंदाजीच्या मर्यादा आता प्रकर्षांने जाणवू लागल्या आहेत. बांगलादेशविरुद्धच्या लढतीत भारताने न्यूझीलंडविरुद्ध खेळलेला संघच बहुतांशी कायम ठेवला होता. फक्त महेंद्रसिंग धोनीऐवजी यष्टीरक्षणाची जबाबदारी दिनेश कार्तिकवर सोपवण्यात आली. त्यामुळे चेतेश्वर पुजाराला संघात स्थान मिळाले नाही. कारण अंबाती रायुडूला पुजारापेक्षा प्राधान्य देण्यात आले. २०१५च्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेचे ध्येय समोर ठेवून भारतीय संघाची बांधणी करण्यात येत आहे. पण श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारत पुजाराला  खेळवण्याचा जुगार खेळेल की हाच संघ कायम राखणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
बांगलादेशविरुद्धच्या लढतीत वरुण आरोन महागडा ठरला. मुशफिकर रहिम आणि अनामुल हक यांनी आरोनवर तुफानी हल्ला चढवून शतकी भागीदारी रचली. त्यामुळे बांगलादेशला ७ बाद २७९ धावा करता आल्या. बांगलादेशच्या फलंदाजांनी त्यांच्या ७.५ षटकांत ७४ धावा चोपून काढल्या. त्यामुळे आरोनला श्रीलंकेविरुद्ध खेळवणे धोकादायक ठरू शकेल. श्रीलंकेचा फलंदाज कुमार संगकारा आणि सलामीवीर लाहिरू थिरिमाने फॉर्मात आहेत.

जानेवारीच्या अखेरीस श्रीलंकेच्या संघाने बांगलादेशच्या वातावरणाशी चांगल्या पद्धतीने जुळवून घेतले होते. कसोटी मालिकेत १-०, ट्वेन्टी-२० मालिकेत २-० आणि एकदिवसीय मालिकेत ३-० अशा फरकाने श्रीलंकेने विजय मिळवला होता. या दौऱ्यात संगकाराने आपल्या कारकीर्दीतील पहिले त्रिशतक साकारले होते. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही  संगकाराने अर्धशतक केले होते. परंतु युवा थिरिमानेने शतकी खेळी साकारली होती.

प्रतिस्पर्धी संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, वरुण आरोन, ईश्वर पांडे, अमित मिश्रा, अंबाती रायुडू आणि स्टुअर्ट बिन्नी.
बांगलादेश : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), कुसल परेरा, लाहिरू थिरिमाने, कुमार संगकारा (यष्टीरक्षक), महेला जयवर्धने, थिसारा परेरा, चतुरंगा डी’सिल्व्हा, दिनेश चंडिमल, सचित्र सेनानायके, लसिथ मलिंगा, सुरंगा लकमल, अजंठा मेंडिस, अशान प्रियंजन आणि धम्मिका प्रसाद.
सामन्याची वेळ : दुपारी १.३० वाजल्यापासून.
थेट प्रक्षेपण : स्टार क्रिकेट-३ वाहिनीवर.

उमर तारणहार!
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर ७२ धावांनी विजय
पीटीआय, फतुल्लाह
एकामागून एक फलंदाज धारातीर्थी पडत असताना उमर अकमलने झळकावलेले धडाकेबाज नाबाद शतक आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने अफगाणिस्तानवर ७२ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानला उमरच्या शतकाच्या जोरावर ८ बाद २४८ अशी मजल मारता आली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा डाव १७६ धावांवर संपुष्टात आला. संघाला अडचणीतून बाहेर काढत विजयाचा पाया रचणाऱ्या उमरला या वेळी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
पाकिस्तानच्या २४९ धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला ३२ धावांवर पहिला धक्का बसला. पण त्यानंतर नूरअली झरदान (४४), नवरोझ मंगल (३५) आणि असगर स्टानिकझई (४०) यांनी संघाला सावरवण्याचा प्रयत्न केला. पण अन्य फलंदाजांना त्यांना अपेक्षित साथ न देता आल्याने त्यांना पराभव स्वीकारावा लागला. पाकिस्तानकडून मोहम्मद हफिझने सर्वाधिक तीन, तर सइद अजमल आणि उमर गुल यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
तत्पूर्वी, अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत पाकिस्तानला फलंदाजीसाठी पाचारण केले आणि त्यांचा निर्णय योग्य असल्याचे दिसून आले. पाकिस्तानची डावाची सुरुवात चांगली झाली असली तरी ५५ धावांच्या सलामीनंतर त्यांचा डाव कोसळायला सुरुवात झाली. बिनबाद ५५वरून अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी पाकिस्तानची ६ बाद ११७ अशी अवस्था केली. पण यादरम्यान एका टोकाकडून संयत फलंदाजी करणाऱ्या उमरने पाकिस्तानला सावरले. उमरला २८ धावांवर जीवदान मिळाले होते आणि त्याने त्याचा पुरेपूर फायदा उचलत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. उमरने ८९ चेंडूंमध्ये ७ चौकार आणि ३ षटकारांच्या जोरावर नाबाद १०२ धावांची खेळी साकारत संघाला सावरले.
संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान : ५० षटकांत ८ बाद २४८. (उमर अकमल नाबाद १०२, अहमद शेहझाद ५०; मिरवैस अश्रफ २/२९) विजयी वि. अफगाणिस्तान : ४७.२ षटकांत सर्व बाद १७६. (नूरअली झरदान ४४; मोहम्मद हफिझ ३/२९)
सामनावीर : उमर अकमल.