Asia Cup Rising Stars 2025, India A vs Bangladesh A: एशिया कप रायजिंग स्टार्स २०२५ स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलचा सामना भारत अ आणि बांगलादेश अ या दोन्ही संघांमध्ये पार पडला. रोहा येथे पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश अ संघाने १९४ धावांचा डोंगर उभारून भारतासमोर विजयासाठी १९५ धावांचं आव्हान ठेवलं. हा सामना बरोबरीत राहिला. शेवटी सुपर ओव्हरमध्ये बांगलादेश अ संघाने भारतावर विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.
या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून वैभव सूर्यवंशीने ३८ धावांची ताबडतोड सुरुवात करून दिली. त्यानंतर प्रियांश आर्यने ४४ धावा चोपल्या. शेवटी जितेश शर्माने ३३ आणि नेहाल वढेराने नाबाद ३२ धावांची खेळी करून भारतीय संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवलं. शेवटच्या षटकात विजयासाठी १६ धावा करायच्या होत्या. शेवटी आशुतोष शर्माने चौकार आणि षटकार मारले. पण २ चेंडूत ४ धावांची गरज असताना आशुतोष शर्मा बाद झाला. त्यामुळे जिंकण्यासाठी १ चेंडूत ४ आणि सुपर ओव्हरसाठी ३ धावा करायच्या होत्या. हर्ष दुबेने धावून ३ धावा पूर्ण केल्या आणि सामना बरोबरीत सुटला.
सुपर ओव्हरमध्ये भारताचा पराभव
सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाकडून फलंदाजीला आलेला जितेश शर्मा पहिल्याच चेंडूवर बोल्ड झाला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर जितेश शर्मा झेलबाद झाला. बांगलादेशला विजयासाठी १ धाव करायची होती. बांगलादेशकडून धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेला यासिर अलीदेखील पहिल्याच चेंडूवर बाद झाला. दुसरा चेंडू सुयशने वाईड टाकला. पण या चेंडूवर जितेश शर्माकडे स्टंम्पिंगची संधी होती. ही संधी हुकली आणि भारताचा पराभव झाला.
बांगलादेशने ठेवलं १९५ धावांचे आव्हान
या भारतीय अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बांगलादेश अ संघाने २० षटकांअखेर ६ गडी बाद १९४ धावा केल्या. बांगलादेश अ संघाकडून फलंदाजी करताना सलामीला आलेल्या हबीबूर रहमान सोहनने ६५ धावांची दमदार सलामी दिली. त्यानंतर जिशान आलमने २६ धावांची खेळी केली. तर जावद अब्रारने १३ धावा केल्या. कर्णधार अकबर अली अवघ्या ९ धावा करत माघारी परतला.
शेवटी मेहरोबने ताबडतोड फटकेबाजी करत नाबाद ४८ धावांची खेळी केली. तर यासिर अली १७ धावांवर नाबाद राहिला. या खेळीच्या बळावर बांगलादेशने १९४ धावांपर्यंत मजल मारली. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना गुरजपनीतने सर्वाधिक २ गडी बाद केले. तर हर्ष दुबे, सुयश शर्मा, रमनदीप सिंग आणि नमन धीर यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केले.
