आशिया चषक रायझिंग स्टार्स २०२५ स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. कर्णधार जितेश शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारत अ संघ या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. टीम इंडियाने स्पर्धेच्या गट टप्प्यातील तीनपैकी दोन सामने जिंकत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. २१ नोव्हेंबर म्हणजेच उद्या रायझिंग स्टार्स आशिया चषकातील उपांत्य फेरीतील दोन सामने खेळवले जाणार आहेत.

आशिया चषक २०२५ मधील उपांत्य फेरीसाठी भारत अ, बांगलादेश अ, पाकिस्तान शाहीन्स व श्रीलंका ए हे संघ पात्र ठरले आहेत. उपांत्य फेरीतील विजयी संघ २३ नोव्हेंबरला होणाऱ्या अंतिम सामन्यात खेळताना दिसतील. हा सामना दोहा येथील वेस्ट एंड पार्क येथेही होणार आहे.

भारत अ आणि बांगलादेश अ यांच्यातील पहिला उपांत्य सामना शुक्रवार, २१ नोव्हेंबरला होईल. भारतीय वेळेनुसार सामना दुपारी ३:०० वाजता सुरू होईल. तर नाणेफेक दुपारी २:३० वाजता होईल. दुसरा उपांत्य सामना पाकिस्तान अ आणि श्रीलंका अ यांच्यात रात्री ८ वाजता सुरू होईल. दोन्ही सामने दोहा येथील वेस्ट एंड पार्क येथे खेळवले जातील.

भारत अ व बांगलादेश अ यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना सोनी लिव्ह अॅप व फॅनकोडवर लाईव्ह पाहता येणार आहे. तर हा सामना टीव्हीवर सोनी टेन या टीव्ही चॅनेलवर लाईव्ह प्रसारण पाहता येणार आहे.

पिच रिपोर्ट

आशिया चषक रायझिंग स्टार्सचे सर्व सामने दोहा येथील वेस्ट एंड पार्कच्या मैदानावर खेळवले जात आहेत. कतारच्या राजधानीतील ही खेळपट्टी वेगवेगळ्या सामन्यांमध्ये आपले रंग बदलताना दिसली. भारत अ संघाने युएईविरुद्ध २९७ धावा केल्या आणि पाकिस्तान अ संघाविरुद्ध १४० धावाही करू शकला नाही. त्यामुळे या उपांत्य सामन्यात खेळपट्टी महत्त्वाची भूमिका बजावेल.

ही खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठीही उपयुक्त ठरू शकते. सुरूवातीला चेंडूची मुव्हमेंट होताना दिसेल, ज्यामुळे वेगवान गोलंदाज त्याचा फायदा घेऊ शकतील. सामन्यादरम्यान फिरकी गोलंदाजांनाही मदत मिळू शकते. पण सामना जसजसा पुढे जाईल तसतसे फलंदाजांनाही मदत मिळेल.