आशियाई अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धा ; ज्योतीची दुहेरी पदककमाई

उपांत्य फेरीतही तिने कोरियाच्याच माजी जगज्जेत्या किम यून्हीवर १४८-१४३ अशी मात केली.

महिलांमध्ये सुवर्ण, मिश्र सांघिक प्रकारात ऋषभच्या साथीने रौप्यपदकावर मोहोर

ढाका : भारताची जागतिक अजिंक्यपद तिहेरी पदकविजेती तिरंदाज ज्योती सुरेखा वेन्नमने गुरुवारी आशियाई अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत दुहेरी पदकांवर नाव कोरले. कंपाऊंड प्रकारात महिलांच्या वैयक्तिक गटात सुवर्ण पटकावणाऱ्या ज्योतीने मिश्र सांघिक गटात ऋषभ यादवच्या साथीने रौप्यपदक कमावले.

ज्योतीने भारतासाठी स्पर्धेतील पहिल्या सुवर्णाची नोंद करताना महिला गटाच्या अंतिम फेरीत कोरियाच्या ओह यूह्योनला १४६-१४५ असे अवघ्या एका गुणाच्या फरकाने नमवले. अखेरच्या सेटमध्ये ज्योतीने एकदा १० गुणांवर, तर दोन वेळा नऊ गुणांवर निशाणा साधला. तर तिच्या प्रतिस्पर्धीने तिन्ही वेळेस नऊ गुण मिळवले. उपांत्य फेरीतही तिने कोरियाच्याच माजी जगज्जेत्या किम यून्हीवर १४८-१४३ अशी मात केली.

मिश्र सांघिक प्रकारात किम युन्ही आणि चोई यंघी या कोरियाच्या अग्रमानांकित जोडीने ज्योती-ऋषभ यांच्यावर १५५-१५४ अशी सरशी साधली. अखेरच्या टप्प्यात कोरियन तिरंदाजांनी चारपैकी तीन वेळा १० गुणांवर अचूक निशाणा साधला. तर भारताला दोनदाच १० गुण मिळवता आले. त्यामुळे भारतीय जोडीला सुवर्णपदकाने थोडक्यात हुलकावणी दिली. स्पर्धेतील भारताचे हे तिसरे पदक ठरले. बुधवारी पुरुष संघाने कांस्यपदकाची कमाई केली होती. त्यामध्ये ऋषभसह अभिषेक वर्मा आणि अमन सैनी यांचा समावेश होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Asian archery championship jyoti won the gold medal zws

Next Story
विजयी भव !