भारताची पदकाची पाटी कोरीच!

जागतिक स्पर्धेत भारताने २७ जणांचा संघ पाठवला होता.

(संग्रहित छायाचित्र)

मॅरेथॉनमध्ये टी. गोपी २१व्या स्थानी; टोक्यो ऑलिम्पिकच्या दोन जागा निश्चित

आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा

आशियाई विजेत्या गोपी थोनाकल याला पुरुषांच्या मॅरेथॉन शर्यतीत दमदार कामगिरी करण्यात अपयश आले. त्यामुळे गोपीला २१व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचे आव्हान एकही पदक न मिळवता संमिश्र निकालासह संपुष्टात आले.

जागतिक स्पर्धेत भारताने २७ जणांचा संघ पाठवला होता. पदकांची फारशी अपेक्षा नसताना भारतीय संघाने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत ४ बाय ४०० मीटर मिश्र रिले, पुरुष ३००० मीटर स्टिपलचेस प्रकारात ऑलिम्पिकसाठी स्थान निश्चित केले.

यंदाही भारताला जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत एकाही पदकाची कमाई करता आली नाही. त्यामुळे लांबउडीपटू अंजू बॉबी जॉर्ज हिने २००३मध्ये मिळवलेले कांस्यपदक हे भारतासाठीचे अखेरचे पदक ठरले आहे. अंतिम फेरीत तीन जणांनी मजल मारणाऱ्यांपैकी, स्टिपलचेसपटू अविनाश साबळे आणि ४ बाय ४०० मीटर मिश्र रिले संघाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये जागा मिळवली, तर भालाफेकपटू अन्नू राणी हिने आठवे स्थान प्राप्त केले.

२९ अंश सेल्सियस तापमान आणि हवेत ५० टक्के आद्र्रता असल्याचा फटका मॅरेथॉनपटूंना बसला. त्यामुळेच मॅरेथॉन शर्यतीला सुरुवात करणाऱ्या ७३ जणांपैकी १८ धावपटूंना ही शर्यत पूर्णच करता आली नाही. ३१ वर्षीय गोपी याने २ तास १५ मिनिटे ५७ सेकंद अशी वेळ नोंदवत २१वे स्थान प्राप्त केले. टोक्यो ऑलिम्पिकसाठी असलेला २ तास ११ मिनिटे आणि ३० सेकंदाचा पात्रता निकष पार करण्याचे ध्येय गोपीने बाळगले होते. पण वातावरणाचा फटका बसलेल्या गोपीला आपल्या वैयक्तिक कामगिरीच्या जवळही पोहोचता आले नाही.

गोपीने २ तास १५ मिनिटे ४८ सेकंद अशी वेळ देत आशियाई मॅरेथॉन शर्यत जिंकली होती. मार्च महिन्यात त्याने सिऊल येथे २ तास १३ मिनिटे ३९ सेकंद इतकी कामगिरी नोंदवली होती.

इथिओपियाच्या लेलिसा डेनिसा आणि मोसिनेट गेरेम्यू यांनी अनुक्रमे २ तास १० मिनिटे ४० सेकंद आणि २ तास १० मिनिटे ४४ सेकंद अशी वेळ देत सुवर्ण आणि रौप्यपदक पटकावले. केनियाच्या अमोस किपरुटो याने २ तास १० मिनिटे ५१ सेकंदासह कांस्यपदक प्राप्त केले.

* स्टिपलचेसपटू अविनाश साबळेने अंतिम फेरीसह ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित केले. अविनाशने तीन दिवसांत दोन वेळा राष्ट्रीय विक्रमांची नोंद केली होती.

* भालाफेकपटू अन्नू राणी हिने ६२.४३ मीटरचा राष्ट्रीय विक्रम नोंदवत अंतिम फेरीत स्थान मिळवले. अंतिम फेरी गाठणारी ती पहिली महिला भालाफेकपटू ठरली आहे.

* मोहम्मद अनास, व्ही. के. विस्मया, जिस्ना मॅथ्यू आणि नोआ निर्मल टॉम यांचा समावेश असलेल्या भारताच्या ४ बाय ४०० मीटर मिश्र रिले संघाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवले.

पदकतालिका

क्र.  देश  सुवर्ण रौप्य कांस्य    एकूण

१   अमेरिका  ११  १०  ४   २५

२   केनिया    ५   २   ३   १०

३   जमैका    ३   ४   २   ९

४   चीन ३   ३   ३   ९

५   इथिओपिया    २   ४   १   ७

जस्टिन गॅटलिनला रिलेत पहिले सुवर्णपदकऑलिम्पिकसह जागतिक स्पर्धेत अनेक सुवर्णपदकांना गवसणी घालणारा अव्वल धावपटू जस्टिन गॅटलिन याने पुरुषांच्या ४ बाय १०० मीटर रिले स्पर्धेत अमेरिकेला सुवर्णपदक मिळवून दिले. रिलेमधील पहिले सुवर्णपदक पटकावत गॅटलिनने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. गॅटलिनसह १०० मीटरमधील विजेता ख्रिस्तियन कोलमन, १०० मीटरमधील सुवर्णपदक विजेता नोआ लायलेस तसेच मायकेल रॉड्रिगेज या अव्वल धावपटूंचा समावेश असलेल्या अमेरिकेने ३७.१० सेकंद अशी वेळ देत सुवर्णपदक पटकावले. ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम वेळ ठरली आहे.

प्रशिक्षक अल्बेटरे सालाझर यांच्यावर उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणामुळे चार वर्षांची बंदी घालण्यात आल्यानंतर आपण दर दिवशी उत्तेजक चाचणीला सामोरे जाण्यास तयार आहोत, असे नेदरलँड्सची धावपटू सिफान हसन हिने सांगितले. सिफान हिने १५०० मीटर शर्यतीत ३ मिनिटे ५१.९५ सेकंद अशी वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. यंदाच्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील तिचे हे दुसरे सुवर्णपदक ठरले. गेल्या शनिवारी तिने १० हजार मीटर दावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Asian athletics competition marathon t gopi in 21th place abn

Next Story
विजयी भव !
ताज्या बातम्या