आशियाई बॉक्सिंग स्पर्धा : पूजाला सलग दुसरे सुवर्णपदक

मेरी कोमसह तिघींना रौप्यपदके

मेरी कोमसह तिघींना रौप्यपदके

दुबई : आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत रविवारी चार सुवर्णपदक पटकावण्याची संधी असलेल्या भारतीय महिलांना फक्त एकाच सुवर्णपदकाची कमाई करता आली. पूजा राणीने सलग दुसरे सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. मात्र जगज्जेती एमसी मेरी कोम, लालबुतसाही आणि अनुपमा यांना अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

महिलांच्या ७५ किलो वजनी गटात पूजाने उझबेकिस्तानच्या मावलुडा मोलोनोव्हाचा ५-० असा पराभव केला. २०१९मध्ये झालेल्या स्पर्धेतही पूजाने या वजनी गटात सुवर्णपदक पटकावले होते. यंदा भारतासाठी सुवर्ण जिंकणारी पूजा एकमेव महिला बॉक्सिंगपटू ठरली आहे.

सहा वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या मेरीकडून सुवर्णपदकाच्या अपेक्षा होत्या. मात्र ५१ किलो वजनी गटात कझाकस्तानच्या नाजिम काजैबेने मेरीवर ३-२ अशी सरशी साधली. त्यामुळे सहावे आशियाई सुवर्ण जिंकण्याचे मेरीचे स्वप्न भंगले. तिचे हे कारकीर्दीतील दुसरे आशियाई रौप्यपदक आहे. मेरीने २००३, २००५,२०१०, २०१२ आणि २०१७मध्ये सुवर्णपदके जिंकली होती.

३८ वर्षीय मेरीने आपल्याहून वयाने ११ वर्षांनी लहान असलेल्या नाजिमविरुद्ध अप्रतिम सुरुवात करताना जोमाने हल्ले-प्रतिहल्ले केले. दुसऱ्या फेरीत दोन्ही खेळाडूंनी आक्रमक पवित्रा घेतल्याने बरोबरी झाली. अखेरच्या तीन मिनिटांत मेरीने त्वेषाने लढत दिली. परंतु सामनाधिकाऱ्यांनी विजयाचा गुण नाजिमच्या खात्यावर जमा केला.

कारकीर्दीतील पहिल्याच आशियाई स्पर्धेत खेळणाऱ्या लालबुतसाहीने कडवा प्रतिकार केला. परंतु कझाकस्तानच्या मिलाना सफ्रानोव्हाने लालबुतसाहीवर ३-२ अशी मात केली. नशिबाच्या बळावर भारतीय संघात स्थान मिळवलेल्या लालबुतसाहीने मात्र संपूर्ण स्पर्धेतील दमदार खेळासह चाहत्यांना तिच्या कामगिरीची दखल घेण्यास भाग पाडले.

दिवसाच्या अखेरच्या सामन्यात अनुपमाला पराभव पत्करावा लागला. ८१ किलो वजनी गटात कझाकस्तानच्या लॅझत कुंजेबायेव्हाने अनुपमाला ३-२ असे नमवले. अनुपमाच्या पराभवामुळे भारताच्या नावावर दिवसातील तिसरे रौप्य जमा झाले.

सोमवारी पुरुषांच्या वजनी गटाचे अंतिम सामने रंगणार असून भारताच्या तीन जणांनी अंतिम फेरी गाठली आहे. अमित पांघल (५२२ किलो), शिवा थापा (६४ किलो) आणि संजीत (९१ किलो) हे तिघे सुवर्णपदकासाठी दावेदारी पेश करतील.

 

पूजा राणी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Asian boxing championship pooja rani clinches second successive gold zws

ताज्या बातम्या