उलानबटार : भारताच्या महिला बॉक्सिंगपटूंनी चमकदार कामगिरी करताना आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. जागतिक विजेती मीनाक्षी हुडा (४८ किलो), आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेती प्रीती पवार (५४ किलो), प्रिया घंघास (६० किलो) आणि अरुंधती चौधरी (७० किलो) यांनी सोनेरी यश संपादन केले. तसेच अल्फिया पठाणला (८० किलोहून अधिक) रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
मंगोलिया येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत ५७ किलो वजनी गटात सध्याची जगज्जेती जॅस्मिन लम्बोरियाने निराशा केली. तिला थायलंडच्या दोन वेळच्या जागतिक विजेत्या पुनरावी रुएनरोसकडून ०-५ अशा पराभवाचा सामना करावा लागला. अल्फियाला दीना इस्लम्बेकोवाकडून ०-५ असा पराभव पत्करावा लागला. भारतीय महिला संघाने या स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना चार सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यपदकांसह एकूण १० पदके मिळवली.
मीनाक्षीने यजमान मंगोलियाच्या नोमुंडारी एन्ख अमगलानला ५-० अशा फरकाने नमवत भारताला दिवसातील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. प्रीतीने तीन वेळच्या जगज्जेत्या हुआंग शियाओ-वेनला ५-० असे पराभूत केले. यानंतर प्रियाने उत्तर कोरियाच्या वॉन उन-ग्योंगवर ३-० असा विजय मिळवला. अरुंधतीने अंतिम सामन्यात कझाकस्तानच्या बकित सेइडिशला ४-१ असे पराभूत करण्याची कामगिरी केली.
त्यापूर्वी, निकहत झरीन (५४ किलो), अंकुशिता बोरो (६५ किलो), लवलिना (७५ किलो) आणि पूजा (८० किलो) यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. विश्वनाथ सुरेश (४८ किलो) आणि सचिन सिवाच (६० किलो) हे शुक्रवारी पुरुष गटात आपापली अंतिम लढत खेळतील.
