Asian Champions Trophy, IND vs JAP: आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ मध्ये भारत आणि जपान यांच्यात सामना खेळला गेला. भारतीय संघाने हा सामना जिंकत आपली विजयी घोडदौड कायम सुरू आहे. या विजयासह टीम इंडिया गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचली आहे. भारताने हा सामना ५-१ अशा मोठ्या फरकाने जिंकला. या सामन्यानंतर भारतीय संघ अधिक चमकदार कामगिरी करत आहे. टीम इंडियाचा आशियाई चॅम्पियन्समधील हा सलग दुसरा विजय आहे. यापूर्वी भारताने यजमान संघ चीनचा ३-०च्या फरकाने पराभव केला.

हेही वाचा – Ganesh Chaturthi: बांगलादेशच्या खेळाडूने गणेश चतुर्थीनिमित्त केली बाप्पाची प्रतिष्ठापना, फोटो केले शेअर

पहिल्या क्वार्टरमध्ये भारताचा दबदबा

जपानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय हॉकी संघाने सुरुवातीपासूनच आपला दबदबा कायम राखला. टीम इंडियाने सामना सुरू झाल्यानंतर दोन मिनिटांतच दोन गोल केले होते. त्यामुळे भारतीय संघाने जपानवर पूर्ण वर्चस्व राखले. भारतासाठी पहिला गोल सुखजित सिंगने केला आणि दुसरा गोल अभिषेकने केला. पहिल्या क्वार्टरच्या खेळानंतर टीम इंडिया २-० ने आघाडीवर होती.

दुसऱ्या क्वार्टरचा खेळ सुरू झाला, ज्यामध्ये संजयने खेळाच्या १७व्या मिनिटाला भारताचा तिसरा गोल करून टीम इंडियाला मजबूत स्थितीत आणले. दुसऱ्या क्वार्टरनंतर टीम इंडिया ३-०ने आघाडीवर होती. भारताच्या चमकदार सुरूवातीनंतर पुढच्या दोन क्वार्टरमध्ये जपान पूर्णपणे दडपणाखाली असल्याचे दिसून आले. मात्र, तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताला एकही गोल करता आला नाही. जपानसाठी काझुमासा मात्सुमोटोने ४१व्या मिनिटाला गोल केला. जपानसाठी हा पहिलाच गोल ठरला.

हेही वाचा – Duleep Trophy 2024: आकाशदीपला मोहम्मद शमीने दिला होता गुरूमंत्र, दुलीप ट्रॉफीतील सामन्यात ९ विकेट्स घेतल्यानंतर केला खुलासा

तिसऱ्या क्वार्टरचा खेळ संपल्यानंतर या सामन्यात भारत ३-१ ने आघाडीवर होता. सामन्यातील चौथा क्वार्टर सुरू झाला, तो संपण्यापूर्वी हा सामना ३-१ अशा स्कोअर लाइनवर संपेल असे वाटत होते, पण शेवटच्या काही मिनिटांत उत्तम सिंग आणि सुखजित सिंग यांनी गोल केले. ५४व्या मिनिटाला उत्तम सिंगने आणि ६०व्या मिनिटाला सुखजित सिंगने गोल करत टीम इंडियाला ५-१ असा विजय मिळवून दिला.

हेही वाचा – बाबर आझमला भेटायला आला चाहता, हारिस रौफने पाहिलं आणि…. VIDEO व्हायरल

हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील संघ बुधवारी उपविजेत्या मलेशियाशी भिडणार आहे. मंगळवार हा विश्रांतीचा दिवस आहे. सहा संघांमधील राऊंड-रॉबिन लीगनंतर, अव्वल चार संघ १६ सप्टेंबर रोजी खेळल्या जाणाऱ्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. तर अंतिम सामना १७ सप्टेंबरला होणार आहे.