जिगरबाज खेळ करीत भारतीय पुरुष हॉकी संघाने विजयादशमीपूर्वीच खंडेनवमीच्या दिवशी आशियाई क्रीडा स्पर्धेत तब्बल १६ वर्षांनी सोने लुटले. पेनल्टी शूटआऊटपर्यंत रंगतदार झालेल्या लढतीत त्यांनी गतविजेत्या पाकिस्तानला ४-२ असे नमवले. निर्धारित वेळेत हा सामना १-१ असा बरोबरीत राहिला होता. या विजेतेपदाबरोबरच भारताने रिओ येथे २०१६ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकचे तिकीटही निश्चित केले आहे.
बँकॉकमध्ये १९९८ मध्ये भारताने धनराज पिल्लेच्या नेतृत्वाखाली आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. त्यानंतर भारताला प्रथमच या स्पर्धेत विजेतेपद मिळविता आले. तसेच २००२नंतर भारताने प्रथमच या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.
येथे झालेल्या साखळी गटात भारताने पाकिस्तानविरुद्ध १-२ असा पराभव स्वीकारला होता. या पराभवाची परतफेडही भारताने शानदार विजय नोंदवीत केली.
शेवटपर्यंत रोमहर्षक ठरलेल्या लढतीत दोन्ही संघांनी जिद्दीने खेळ केला व प्रतिस्पर्धी संघांना गोल करण्याची फारशी संधी मिळणार नाही याची काळजीही घेतली. सेओन्हाक स्टेडियमवर झालेल्या या लढतीने प्रेक्षकांना हॉकीचा आनंद मिळवून दिला. सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला महंमद रियाझ (वरिष्ठ) याने पाकिस्तानचे खाते उघडले. तथापि भारताच्या कोठाजित सिंगने २७व्या मिनिटाला गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. पूर्ण वेळेपर्यंत हीच बरोबरी कायम राहिली. त्यामुळे पेनल्टी स्ट्रोक्सचा उपयोग करण्यात आला. त्या वेळी भारताकडून आकाशदीपसिंग, रुपींदरपालसिंग, बीरेंद्र लाक्रा व धरमवीरसिंग यांनी गोल केले तर मनप्रितसिंग याने गोल करण्याची संधी दवडली. भारताचा गोलरक्षक व उपकर्णधार पी. आर. श्रीजेशने आत्मविश्वासाने गोलरक्षण करीत पाकिस्तानच्या अब्दुल हसीम खान व महंमद उमर बट्ट यांचे फटके अडविले. पाकिस्तानचे महंमद वकास व शफाकत रसूल हे दोनच खेळाडू गोल करू शकले.
अटीतटीने झालेल्या लढतीत दोन्ही संघांच्या खेळाडूंनी वेगवान चाली केल्या. मात्र गोल करण्याचा पहिला मान पाकिस्तानला मिळाला. त्यांच्या शफाकत रसूल याने रियाझकडे पास दिला. त्याच्याकडे श्रीजेशचे लक्ष नव्हते. रियाझने मारलेला फटका श्रीजेशला चकवीत गोलात गेला. पाकिस्तानने पहिला गोल केला तरीही त्यानंतर भारतीय खेळाडूंनीच खेळावर नियंत्रण राखले. पहिला गोल स्वीकारल्यानंतर भारतीय खेळाडू खडबडून जागे झाले. रमणदीपसिंग याला १५व्या मिनिटाला गोल करण्याची संधी मिळाली होती मात्र त्याचा फटका पाकिस्तानचा गोलरक्षक इम्रान बट्ट याने शिताफीने रोखला. त्यानंतर एस. व्ही. सुनील यानेही गोलची संधी दवडली. २२व्या मिनिटाला रुपींदर याने मारलेला फटका बट्ट याने परतविला. अखेर २७व्या मिनिटाला भारतीय खेळाडूंना गोल करण्यात यश मिळाले. कोठाजितसिंग याने गुरबाजसिंग याच्या पासवर संघाचे खाते उघडले.
दोन्ही संघांनी त्यानंतर गोल करण्यासाठी खूप प्रयत्न केले मात्र दोन्ही संघांच्या बचावरक्षकांनी या चाली परतविल्या. त्यामुळे १-१ अशा बरोबरीतच सामना संपला.