बॅडमिंटनपटूंसाठी गुरुवारचा दिवस संमिश्र ठरला. भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालने दमदार विजयासह उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली, तर पी. कश्यपने उपउपांत्यपूर्व फेरीत मजल मारली. परंतु पी. व्ही. सिंधू पराभूत झाल्यामुळे भारताच्या आव्हानाला धक्का बसला.
ग्येयांग जिम्नॅशियम कोर्टावर झालेल्या महिला एकेरीच्या लढतीत जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या सायनाने इराणच्या सोराया अघाईहाजिघचा (२-०) २१-७, २१-६ असा पराभव केला.
तथापि, जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर असलेल्या सिंधूने ३४व्या क्रमांकावरील मनुपुट्टी बेलाइट्रिक्सकडून १-२ अशी हार पत्करली. सिंधूने पहिला गेम २२-२० असा जिंकला होता, परंतु नंतरचे दोन गेम १६-२१, २०-२२ असे गमावले. त्यामुळे तिचे आव्हान संपुष्टात आले.
त्याआधी, पारुपल्ली कश्यपने अफगाणिस्तानच्या इक्बाल अहमद शेकिबविरुद्ध सरळ गेममध्ये विजय मिळवत दिमाखात आगेकूच केली. ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत सुवर्णपदक जिंकण्याची किमया साधणाऱ्या कश्यपला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. परंतु गुरुवारी त्याने अफगाणी प्रतिस्पध्र्याचा २१-६, २१-६ असा आरामात पराभव केला.
मिश्र दुहेरीत अक्षय देवलकर आणि प्रज्ञा गद्रे यांनी सिंगापूरच्या त्रियाचार्ट च्यायुत आणि याओ लेई यांच्याकडून २०-२२, २१-१७, १३-२१ अशी हार पत्करली. परंतु मनू अत्री आणि एन. सिक्की रेड्डनी यांनी आपला सामना जिंकत आगेकूच केली. त्यांनी रशीद अफनान आणि शरफुद्दीन नशीऊ जोडीला २१-८, २१-४ असे हरवले.