१८ व्या आशियाई क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय कबड्डी संघाला इराणकडून २७-१८ च्या फरकाने पराभव स्विकारावा लागला. आतापर्यंत ७ वेळा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या भारतीय संघाला पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठण्यात अपयश आलं आहे. उपांत्य सामन्यात इराणने भक्कम बचाव करत भारताला धक्का दिला. या पराभवानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक राम मेहर सिंह यांनी संघाचा कर्णधार अजय ठाकूर याच्यावर पराभवाचं खापर फोडलं आहे.

अजय ठाकूरच्या अतिआत्मविश्वासामुळे भारताला पराभव सहन करावा लागल्याचं राम मेहर सिंह म्हणाले. “सामन्यादरम्यान काही खेळाडू दुखापतग्रस्त होते ही बाब तितकीच खरी आहे. मात्र इराणचा खेळ त्या सामन्यात आमच्यापेक्षा नक्कीच वरचढ होता. त्यामुळे आमचा पराभव आम्हाला मान्य करावाच लागणार आहे.” इराणविरुद्ध पराभवानंतर निराश झालेल्या राममेहर सिंह यांनी आपली प्रतिक्रीया दिली.

१९९० सालच्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डीचा समावेश करण्यात आला होता. त्यावेळपासून भारत आपलं वर्चस्व राखून होता. मात्र इंडोनेशियात इराणने भारताच्या वर्चस्वाला धक्का दिला. या स्पर्धेच्या साखळी सामन्यातही दक्षिण कोरियाने भारताला पराभूत केलं होतं. त्यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धांच्या प्रकारात भारत पहिल्यांदाच कांस्यपदकासाठी खेळणार आहे. भारतीय पुरुषांचं कबड्डीतलं आव्हान संपुष्टात आलं असलं तरीही महिलांच्या संघाकडून भारताला सुवर्णपदकाची आशा कायम आहे. अंतिम फेरीत भारतीय महिलांसमोर इराणचं आव्हान असणार आहे.