भारताची फुलराणी म्हणून ओळख असलेल्या सायना नेहवालला बॅडमिंटन सांघिक प्रकारातील दुसऱ्या एकेरी सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. जपानच्या अव्वल मानांकित नोझुमी ओकुहाराने सायनाचा २१-११, २३-२५, २१-१६ अशा सेट्समध्ये पराभव केला.

अवश्य वाचा – Asian Games 2018 – सिंधूची आक्रमक सुरुवात, जपानच्या अकाने यामागुचीवर केली मात

याआधी पहिल्या सामन्यात सिंधूने जपानच्या यामागुचीचा अडसर दूर केल्यानंतर सायना नेहवालच्या सामन्याकडे सर्वांचं लक्ष होतं. जपानच्या नोझुमी ओकुहाराविरुद्ध सामना खेळत असलेल्या सायनाला पहिल्याच फेरीत मोठा धक्का बसला. ओकुहाराने २१-११ च्या फरकाने पहिला सेट जिंकत बाजी मारली. यानंतर दुसऱ्या सेटमध्येही ओकुहाराने आपलं वर्चस्व कायम राखलं होतं. मात्र सायनाने दुसऱ्या सेटच्या उत्तरार्धात धडाकेबाज पुनरागमन करत तब्बल ४ मॅच पॉईंट वाचवले. आपला सर्व अनुभव पणाला लावत सायनाने दुसऱ्या सेटमध्ये ओकुहाराची झुंज २३-२५ ने मोडून काढली.

तिसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी सावध सुरुवात केली. सायना आणि ओकुहारामध्ये तिसऱ्या सेटदरम्यान काही चांगल्या रॅलीज रंगताना दिसल्या. मात्र मध्यांतरापर्यंत सायनाने आपला अनुभव पणाला लावत ११-१० अशी नाममात्र एका गुणाची आघाडी घेतली. मात्र अखेरच्या क्षणांमध्ये ओकुहाराने बाजी मारत तिसरा सेट २१-१६ च्या फरकाने जिंकत सामना आपल्या खिशात घातला.