– केदार ओक

आशियाई स्पर्धेत आपलं सगळं सुरळीत चालू आहे असं वाटत असतानाच लिअँडर पेसने काल एक जोरदार धक्का दिला. पेसने त्याच्या मनासारखा जोडीदार मिळाला नाही म्हणून – ‘मी खेळू शकणार नाही’ असं टेनिस संघटनेला कळवलं. स्पर्धेच्या केवळ दोन दिवस आधी अशी बातमी देऊन त्याने संघाला व्यवस्थित खिंडीत गाठलेलं आहे. लिअँडर पेसच्या देशप्रेमाबद्दल शंका घेण्याचा आपल्याला फार अधिकार नाही पण त्याच्या अशा इगोने भरलेल्या वागण्यामुळे भारताच्या दुहेरीतल्या नवोदित खेळाडूंना चांगल्या संधीला मुकावं लागणार आहे.

असो, आज बॅडमिंटनवर बोलायचं होतं खरंतर पण संघनिवडीवरून प्रत्येक मोठ्या स्पर्धेआधी होणारे हे वादविवाद अगदीच उबग आणणारे आहेत. बॅडमिंटनच्या संघनिवडीवरूनही थोडा वादंग झाला होताच. अपर्णा बालन नावाच्या दुहेरीतल्या खेळाडूने दुहेरीतली अतिरिक्त जोडी नं निवडता एकेरीतले नवोदित खेळाडू निवडले (ज्यात कोच गोपीचंद यांची मुलगी आहे) ह्या कारणावरून कोर्टात दावा उभा केला होता. बॅडमिंटन संघटनेने त्याची पुरेशी योग्य, नियमात बसणारी आणि पटतील अशी कारणं दिली आहेत हा भाग निराळा. मुद्दा असा की वाद सोडून आपल्याला पुढे जाता येत नाहीये.

आशियाई स्पर्धेत टेनिसची जी अवस्था आहे त्याच्या अगदी उलट बॅडमिंटनची आहे. जगातले सर्वाधिक टॉप क्लासचे खेळाडू हे अजूनही आशियातूनच बाहेर पडतात, त्यातही विशेषतः पूर्व आशिया. त्यामुळे आशियाई स्पर्धेत तुल्यबळ, तोडीस तोड स्पर्धा बघायला मिळेल. आशियाई स्पर्धेत बॅडमिंटनचा समावेश झाल्यापासून आपला भारत देश सहभागी होत आहे. आपली आत्तापर्यंतची कामगिरी निराशाजनक अशीच म्हणावी लागेल. १४ स्पर्धांमध्ये मिळून आपण ८ ब्रॉन्झ पदकं जिंकू शकलो आहोत. विशेष म्हणजे आठपैकी पाच पदकं आपण १९८२ च्या दिल्लीच्या एकाच स्पर्धेत मिळवली. त्या वर्षी सय्यद मोदीनी जिंकलेल्या वैयक्तिक ब्रॉन्झनंतर आपण एकही वैयक्तिक पदक मिळवू शकलो नाहीये. अर्थात तो काळ आता जुना झाला. गेल्या काही वर्षात भारतीय बॅडमिंटनची परिस्थिती झपाट्याने बदलली आहे.

कोणत्याही ‘खेळा’ची गोष्ट निसर्गाच्या सर्वसाधारण नियमांसारखीच आहे. पाणी किंवा दूध तापत ठेवलेलं असतं, एकीकडे ते तापत असतं आपण बऱ्यापैकी निवांतपणे आपापली कामं करत असतो. पण तो एक ‘क्लायमेटिक’ क्षण येतो आणि दूध ऊतू जातं किंवा पाणी उकळून उकळून वर ठेवलेल्या झाकणाला धडका मारून गॅसवर सांडायला लागतं तेव्हा आपण भानावर येतो. आपल्या भारतासारख्या देशात कोणताही खेळ यशस्वी होण्यासाठी किंवा त्या खेळाची संस्कृती रुजण्यासाठी हे असं कुणालातरी ‘ऊतू’ जावं लागतं तेव्हाच सगळ्यांचं लक्ष्य वेधलं जातं. १९८३ च्या आधी आपण क्रिकेट खेळत नव्हतो का? खूप वर्षं खेळत होतो की. पण कपिलच्या १७५, तो रिचर्ड्सचा कॅच, मग तो वर्ल्डकप घडला; खेळाचा धर्म झाला आणि लाखो भोई या वारीत सामील झाले. जेव्हा एखादा पदुकोण किंवा गोपीचंद जिंकतो तेव्हाच भरपूर सायना, सिंधू आणि श्रीकांत तयार होतात. बुद्धीबळही आपण खेळतच होतोच पण जेव्हा विश्वनाथन आनंद ग्रँडमास्टर बनतो तेव्हाच मग अगणित ग्रँडमास्टर्सची लाट येते.

गेल्या दशकात आपल्या बॅडमिंटनची वेगात प्रगती झाली आहे. भारताची बॅडमिंटनची सध्याची फळी गेल्या कित्येक वर्षातली सर्वोत्तम आहे. कोच गोपीचंद ह्यांनी स्पर्धेला निघण्यापूर्वी सांगितलं आहे की – आम्हाला प्रत्येक गटात पदकाची संधी आहे. खरंच आहे ते. गेल्या काही महिन्यातली ही तिसरी मोठी स्पर्धा आहे. आधी झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये आपण धवल यश मिळवलं. त्यानंतर झालेल्या वर्ल्ड बॅडमिंटन स्पर्धेत केवळ सिंधूच्या रूपाने एक रौप्यपदक मिळालं मात्र कदाचित त्यामुळेच आपले इतर खेळाडू यावेळी अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक असतील. They must have fire in their belly.

प्रत्येक स्पर्धेप्रमाणे आपल्या आशा प्रामुख्याने श्रीकांत, प्रणॉय, सिंधू आणि सायनावर असतील. सिंधूला गेल्या वर्षीपासून अनेक अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे त्यामुळे यंदा तरी तिला निर्णायक घाव घालायला जमेल अशी आशा आपण ठेऊया. सिंधू दीर्घकाळ चालणाऱ्या रॅलीज गुण जिंकून संपवायला थोडी कमी पडते आहे असं दिसून येतं. अर्थात तिचे मार्गदर्शक आणि ती स्वतः ह्या गोष्टींवर उपाय शोधून काढत असतीलच. सिंधू बऱ्याचदा भोज्याला हात लावून आली आहे त्यामुळे तिच्या क्षमतेविषयी कुणाला शंका असण्याचं कारणच नाही. तसंच श्रीकांत हा आपला एक प्रचंड गुणवान खेळाडू आहे. काही महिन्यांपूर्वी तो ‘वर्ल्ड नंबर वन’ पदाला स्पर्शही करून आलेला आहे. मात्र सातत्यात श्रीकांत जरा कमी पडतो. गेल्या महिन्यातल्या वर्ल्ड गेम्समध्ये त्याला खूप सोपा ड्रॉ आलेला होता मात्र तो पदक मिळवण्यास कमी पडला. त्यालाही स्वतःच्या क्षमतेला साजेशी कामगिरी करायला नक्कीच आवडेल.

एच. एस. प्रणॉय आपला जायंट किलर म्हणून ओळखला जातो. जेव्हा तो भरात असतो तेव्हा तो जगातल्या सर्वोत्तम खेळाडूंना नमवू शकतो मात्र खेळ खालावला की खालच्या दर्जाच्या प्रतिस्पर्ध्याकडूनही हार पत्करू शकतो. त्याचं पूर्ण स्पर्धेत भरात असणं आपल्याला गरजेचं आहे. सायना नेहवाल ही भारताची पहिली फुलराणी. दुखापतींमधून ती आता सावरली आहे पण वाढतं वय तिच्याविरुद्ध जाणारं आहे. तरी अजूनही तिचा दिवस असेल तर टॉप खेळाडूंना मात देण्याची तिची क्षमता शाबूत आहे. एकेरी आहेच, शिवाय सांघिक स्पर्धेत सायनाचा खेळ आणि अनुभव ह्याचा आपल्याला मोठा फायदा होऊ शकतो. गेल्या आशियाई स्पर्धेत महिलांनी सांघिक पदक मिळवलं होतं तेव्हा तिचा सहभाग महत्वाचा होता. हे चार मुख्य खेळाडू सोडले तर साईप्रणित, समीर वर्मा हे खेळाडूही सांघिक खेळात महत्वाची भूमिका बजावू शकतात. दुहेरीत सात्विक साईराज रणकीरेड्डी हा १८ वर्षांचा युवा खेळाडू जोमाने प्रगती करतो आहे. त्याची चिराग शेट्टी आणि अश्विनी पोनप्पाबरोबरची जोडी चांगलंच खेळते आहे. मनू अत्री, सुमित रेड्डी, प्रणव चोप्रा, सिकी रेड्डी असे बरेच खेळाडू संघासोबत असणार आहेत.

यंदा बॅडमिंटन संघ खरोखरच उत्तम आहे पण आशियाई बॅडमिंटनमध्ये स्पर्धाच इतकी कठीण आहे की पदकाची शाश्वती देता येत नाही. संधी मात्र यंदा नेहमीपेक्षा नक्कीच जास्त आहे. महिलांमध्ये चायनीज तैपेईची ताई झुइंग ही जागतिक नंबर वन आहे. तिचं पादलालित्य, वेग अफलातून आहे. जपानी द्वयी ओकूहारा आणि यामागुची ह्याही धोकादायक प्रतिस्पर्धी आहेत. सिंधू त्यांना हरवू शकते, त्यांना हरवलंही आहे पण त्या दोघींनीही सिंधूला मोक्याच्या वेळी सुवर्णपदक मिळवण्यापासून रोखलं आहे हे विसरून चालणार नाही. हे बिंगजियाओ, रातचानोक इंटेनॉन, सुंग जी ह्युन सारख्या खेळाडूही आहेतच. खरंतर टॉप टेनमधल्या सगळ्या प्रतिस्पर्धी उत्तम आहेत आणि सुवर्ण जिंकायचं असेल तर प्रत्येक दिवशी सर्वोत्तमच खेळ खेळावा लागणार आहे.

पुरुषांच्या स्पर्धेत जपानी युवा खेळाडू केंटो मोमोटा हा सध्या सर्वात धोकादायक खेळाडू. नुकतंच त्याने चिनी वर्चस्व मोडून काढत पहिला जपानी जागतिक विजेता बनण्याचा पराक्रम केलेला आहे. इतिहासातला सर्वोत्तम खेळाडू लिन डॅनच्या पराक्रमाच्या जवळपास जाण्याची क्षमता त्याच्यात नक्कीच आहे. दुसरीकडे लिन डॅन अजूनही खेळतो आहेच पण स्पर्धाच इतकी कठीण आहे की यंदा त्याला एकेरीत खेळायला मिळणार नाही. नवोदित शि युकी आणि ऑलिपिक्स चॅम्पियन चेन लॉन्ग यांचं मानांकन लिन डॅनपेक्षा उजवं असल्याने हे आक्रीत होणार आहे. अर्थात विवेकबुद्धीने विचार केला तर लिन डॅन हा लिजन्ड असला तरी तो हल्ली फार स्पर्धा खेळत नाही आणि पूर्वीसारखा अजिंक्यही राहिलेला नाही. मात्र सांघिक स्पर्धेत चीनला त्याची मदत नक्कीच होईल. महत्वाच्या सामन्यांमधला त्याचा अनुभव वादातीत आहे. मलेशियाचा मातब्बर खेळाडू ली चॉन्ग वेई दुखापतीमुळे खेळणार नाहीये ही भारतीय गोटाच्या दृष्टीने एक चांगली गोष्ट. श्रीकांत किंवा प्रणॉय ह्या दोघांपैकी एकाने तरी पदक जिंकायला हवं असं मनापासून वाटतंय कारण त्यांची क्षमता आहे. पदकाचा रंग सोनेरी असेल तर अजूनच छान.

आपण भारतीयांना अशा खेळांमध्ये सातत्याने पदकं जिंकायची, जग जिंकायची सवय नाहीये त्यामुळे खेळाडूच्या प्रयत्नांनाही आपण भरपूर प्रोत्साहन देतो. ते द्यायलाच हवं. प्रेक्षकांचं मनं जिंकण्यात आपले खेळाडू यशस्वी होतातच, पण हे चित्र वर्षानुवर्षे तसंच राहणंही चांगलं नाही, हो ना? आपल्या खेळाडूंची क्षमता आता जागतिक दर्जाच्या तोडीस तोड आहे तर मग का आपण प्रत्येक वेळेस स्वतःला इंफिरिअरिटी कॉम्प्लेक्सनी झाकोळू द्यायचं? अर्थात कोणतंही पदक मिळालं तरी कौतुकास्पद आहेच, त्याची हेटाळणी होणार नाही हे नक्कीच पण सुवर्ण जिंकायची हीच योग्य वेळ आहे हे नाकारता येणार नाही. भारताच्या सगळ्या बॅडमिंटनपटूंना आणि खरंतर संपूर्ण क्रीडा चमूला माझ्याकडून भरपूर शुभेच्छा. Go for the glory!