हांगझू : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पर्यावरणास अनुकूल तंत्रज्ञानाची जोड मिळालेल्या १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेला भव्य आणि नेत्रदिपक सोहळय़ाने शनिवारी दिमाखदार सुरुवात झाली. हा सोहळा म्हणजे चीनचा सांस्कृतिक इतिहास आणि खंडाच्या एकात्मतेचा मेळ घालणारा असाच होता. आशियातील नव्या पर्वाची सूत्रे (टाईड्स सर्जिग इन आशिया) घेऊन उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. चीन, आशिया आणि नव्या युगातील जगाचे एकत्रिकरण, तसेच आशियाई लोकांची एकता, प्रेम, मैत्री याचे या सोहळय़ातून यथार्थ दर्शन घडविण्यात आले.
हेही वाचा >>> पुरुष हॉकी संघाची उझबेकिस्तानशी आज सलामी




हजारो वर्षे जुनी सभ्यता आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मिश्रणातून देशाचा सांस्कृतिक वारसा चीनकडून कसा जपण्यात आला याचे अप्रतिम सादरीकरण उद्घाटन सोहळय़ात करण्यात आले. सामथ्र्यशाली चीनचे प्रदर्शन हा सोहळय़ाचा दुसरा भाग तितकाच आकर्षक ठरला. पूर्वेकडील सौंदर्यशास्त्र आणि जागतिक प्रेक्षकांशी जोडणारा दृष्टीकोन याच्या एकत्रित सादरीकरणाने चीनच्या आधुनिकीकरणातील ताकद दिसून आली. क्रीडाज्योत प्रज्वलित करताना चीनच्या तांत्रिक शक्तीचे दर्शन झाले. या मशाल प्रज्वलनाच्या एकूणच पद्धतीमुळे ‘डिजिटल तंत्रज्ञाना’चे महत्त्व अधोरेखित झाले. पर्यावरणपूरक स्पर्धा असल्यामुळे फटाक्यांची आतषबाजी न करता ती आभासी पद्धतीने दाखविण्यात आली. चीनचे अध्यक्ष शी जिनिपग यांनी स्पर्धेचे उद्घाटन झाल्याची घोषणा केली.
आज महत्त्वाचे..
* महिला क्रिकेट
उपांत्य फेरी
भारत वि. बांगलादेश
सकाळी ६.३० वा.
* महिला बॉक्सिंग
प्रीती पवार (५४ किलो)
सकाळी ११.४५ वा.
निकहत झरीन (५० किलो) दु. ४.३० वा.
* रोईंग
गटांनुसार अंतिम फेरी सकाळी ६.३० वा.
* बुद्धिबळ
पुरुष पहिली, दुसरी फेरी विदित गुजराथी, अर्जुन एरिगेसी
महिला पहिली, दुसरी फेरी कोनेरू हम्पी, द्रोणावल्ली हरिका दुपारी १२.३० वा.
* फुटबॉल
साखळी फेरी (महिला)
भारत वि. थायलंड
दुपारी १.३० वा.
साखळी फेरी (पुरुष)
भारत वि. म्यानमार
सायं. ५ वा.
* व्हॉलीबॉल (पुरुष)
अव्वल ६ फेरी
भारत वि. जपान
दुपारी १२ वा.
* टेबल टेनिस
उपउपांत्यपूर्व फेरी
भारत वि. थायलंड (महिला)
सकाळी ७.३० वा.
उपउपांत्यपूर्व फेरी
भारत वि. कझाकस्तान (पुरुष)
सकाळी ९.३० वा.
टेबल टेनिस : पुरुष, महिला संघ उपउपांत्यपूर्व फेरीत
भारतीय पुरुष आणि महिला संघांनी चमकदार कामगिरीसह आशियाई क्रीडा स्पर्धेच्या टेबल टेनिसमध्ये उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भारतीय पुरुष संघाने ताजिकिस्तानचा, तर महिला संघाने नेपाळचा ३-० अशाच फरकाने पराभव केला. भारतीय महिला संघ गटात अव्वल स्थानावर राहिला. महिला संघासाठी दिया चितळे, अहिका मुखर्जी आणि सुतिर्था मुखर्जी यांनी विजय मिळवले. पुरुष संघासाठी मानव ठक्कर, मनुष शहा, हरमित देसाई विजयी ठरले.