Asian Games 2026 Boxing Three Gold Medals October 2: भारताच्या खेळाडूंनी बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदकांची हॅटट्रिक लगावली आहे. २ ऑक्टोबरला भारताला बॉक्सिंगमध्ये सलग तीन सुवर्णपदकं मिळाली आहेत. भारताच्या या सलग तीन सुवर्णपदकांसह गुणातलिकेत भारताच्या सुवर्णपदकांची संख्या १४ वर पोहोचली आहे. भारताला बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदकं मिळवून देणारे तीन बॉक्सर कोण आहेत, पाहूया.
लव्हलिना बोरगोहेनने केला सुवर्णपदकांचा श्रीगणेशा
लव्हलिना बोरगोहेन भारताला आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील पहिलं सुवर्णपदक पटकावून दिलं. लव्हलिना बोर्गोहेनने २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेत स्वतःला वाढदिवसाची अविस्मरणीय भेट दिली. महिलांच्या ७५ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात लव्हलिनाने सुवर्णपदक पटकावलं. अंतिम सामन्यात लव्हलिनाने २०२६ आशियाई अजिंक्यपद स्पर्धेची सुवर्णपदक विजेती चीनची बाओ झियी हिच्याविरुद्ध शानदार कामगिरी करत ५-० असा एकतर्फी विजय मिळवला. यासह तिने हांगझोऊ २०२२मधील रौप्यपदकाचं सुवर्णपदकात रूपांतर केलं.
कांस्यपदक काढून घेतल्यानंतर आशियाई खेळात सुवर्णपदक पटकावणारी भारताची लेक
लव्हलिना बोरगोहेननंतर भारताची बॉक्सर परवीन हुड्डाने सुवर्णपदक भारताच्या झोळीत टाकलं. शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात तिने चायनीज तैपेईची पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती चेन निएन-चिन हिच्यावर ३-२ असा निसटता विजय मिळवला. यापूर्वी उपांत्य फेरीत परवीनने चीनच्या ली शू हिचा ५-० असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.या विजयासह परवीनने हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपली कामगिरीही मागे टाकली आहे. मागील स्पर्धेत तिने कांस्यपदक जिंकलं होतं. मात्र, व्हेअरअबाउट्स फेल्युअर प्रकरणात इंटरनॅशनल टेस्टिंग एजन्सीने (ITA) तिच्यावर २२ महिन्यांची बंदी घातल्यानंतर तिच्याकडून ते कांस्यपदक काढून घेण्यात आलं होतं. पण या सगळ्या गोष्टी मागे टाकत तिने सुवर्णकामगिरी केली.
अंकुश पंघालची २१व्या वर्षी सुवर्णकामगिरी
२१ वर्षीय अंकुश पंघालने २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला बॉक्सिंगमधील आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिलं. अंकुशने अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाच्या किम मिनसॉन्गचा ४-० असा स्प्लिट निर्णयाने पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरलं. यासह २०१८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा अमित पंघालनंतरचा पहिला भारतीय पुरुष बॉक्सर ठरला. उपांत्य फेरीत अंकुशने दमदार पुनरागमन करत उझबेकिस्तानचा विद्यमान ७५ किलो वजनी गटातील जागतिक विजेता फझलिद्दीन एर्किनबोएव याचा ४-१ असा पराभव केला होता. या विजयासह त्याने ८० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
