भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेतील फायनलचा सामना पार पडला. या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने पाकिस्तानवर १९ धावांनी विजय मिळवला. गोल्ड मेडलसाठी पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकांअखेर २११ धावा केल्या. पाकिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी २१२ धावा करायच्या होत्या. पण पाकिस्तानला १९२ धावांपर्यंत मजल मारता आली. यासह भारतीय संघाने हा सामना १९ धावांनी जिंकून सलग दुसऱ्यांदा गोल्ड मेडलवर नाव कोरलं. दरम्यान कोण आहेत भारतीय संघाच्या विजयाचे ५ हिरो? जाणून घ्या.
१)अभिषेक शर्मा
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाला वैभव सूर्यवंशीकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. पण तो स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर अभिषेक शर्माने मिळून डाव सांभाळला. त्याने अवघ्या २० चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. ६१ धावांच्या खेळीदरम्यान त्याने ३ चौकार आणि ७ गगनचुंबी षटकार खेचले. दरम्यान या खेळीच्या बळावर भारतीय संघाचा पाया मजबूत झाला.
२)तिलक वर्मा
भारतीय संघाला चांगली सुरुवात मिळाली. पण मधल्या षटकांमध्ये विकेट्स गेल्याने धावांची गती मंदावली होती. त्यामुळे शेवटी तुफान फटकेबाजी करण्याची गरज होती. तिलकने २२ चेंडूत ५१ धावांची खेळी केली. यासह त्याने शिवम दुबेसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. या भागीदारीच्या बळावर भारतीय संघाने २०० धावांचा पल्ला गाठला.
३) शिवम दुबे
शिवम दुबेने या सामन्यात फिनिशरची भूमिका बजावली. त्याने तिलक वर्मासोबत मिळून महत्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली. यासह भारतीय संघाला विकेट्सची गरज असताना त्याने २ महत्वपूर्ण गडी देखील बाद केले.
४)अक्षर पटेल
मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला चांगल्या सुरुवातीची गरज होती. पण अक्षर पटेलने पाकिस्तानची चांगली सुरुवात होऊच दिली नाही. त्याने सदाकतला २३ आणि उस्मान खानला ३ धावांवर माघारी धाडलं.
५) वॉशिंग्टन सुंदर
वॉशिंग्टन सुंदरने या सामन्यात गोलंदाजी करताना १ गडी बाद केला. पण निर्णायक षटक टाकून त्याने भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. या सामन्यात त्याने साहिबजादा फरहानला बाद करत माघारी धाडलं.
