India vs Pakistan Hand Shake Controversy: आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेतील महिलांच्या क्रिकेट प्रकारात भारतीय संघाने श्रीलंकेला पराभूत करून गोल्ड मेडल पटकावलं होतं. आता भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडेही गोल्ड मेडलवर नाव करण्याची संधी असणार आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये फायनलचा थरार रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ह संघ आमनेसामने येणार असल्याने पुन्हा एकदा हँडशेकचा मुद्दा चर्चेता आला आहे. आशिया चषक २०२५ स्पर्धेनंतर जितक्या वेळेस भारत – पाकिस्तान सामने झाले आहेत, त्या सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूंनी हँडशेक करणं टाळलं आहे. दरम्यान IOC चा नियम काय सांगतो? जाणून घ्या.

पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानसोबत खेळण्यास तर होकार दिला, पण पाकिस्तानी खेळाडूंसोबत हँडशेक करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे या सामन्याआधीही हँडशेकचा मुद्दा चर्चेत आहे. पण आशियाई क्रीडा स्पर्धा ही बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड या दोन्ही संघांतील आयसीसीच्या अंतर्गत होणारी स्पर्धा नाही. ही २ देशांमध्ये होणारी स्पर्धा आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीचे नियम पूर्णपणे वेगळे आहेत. OCA किंवा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) च्या नियमांनुसार खेळाडूंनी एकमेकांशी हस्तांदोलन करणे बंधनकारक नाही. मात्र, खेळाडूवृत्तीचा भाग म्हणून हस्तांदोलन करणे ही एक सामान्य पद्धत मानली जाते.

याआधी २०१६ मध्ये झालेल्या रियो ऑलिम्पिक स्पर्धेत इजिप्तचा ज्युडोपटू इस्लाम अल शेहाबीने इस्त्रायलचा खेळाडू ओर सॅसनने हस्तांदोलन करण्याशी नकार दिला होता. IOC ने त्याच्यावर कुठलीही आर्थिक कारवाई केली नव्हती. पण, निष्पक्ष खेळाच्या भावनेविरुद्ध आणि ऑलिम्पिकच्या नियमांच्या विरोधात वागल्याबद्दल त्याला कडक शब्दांत फटकारलं होतं. त्यानंतर इजिप्तच्या संघाने त्याला मायदेशी पाठवलं होतं.

भारत आणि पाकिस्तान सामना किती वाजता सुरू होणार?

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये होणारा गोल्ड मेडलचा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. तर स्थानिक वेळेनुसार हा सामना १:३० वाजता सुरू होणार आहे. त्याआधी सकाळी ९:३० वाजता नाणेफेक होणार आहे. या सामन्यात भारतीय श्रेयस अय्यर भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. तर साहिबजादा फरहान पाकिस्तानचं नेतृत्व करताना दिसेल.