Asian Games 2026, India vs Pakistan Final: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने क्रिकेटमध्ये डबल गोल्ड पटकावलं आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये झालेल्या फायनलमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानसमोर विजयासाठी २१२ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला १९२ धावांपर्यंत मजल मारता आली. यासह भारताने सलग दुसऱ्यांदा क्रिकेटमध्ये गोल्ड मेडलवर नाव कोरलं आहे.

याआधी झालेल्या महिलांच्या क्रिकेट प्रकारातही भारतीय संघाचा बोलबाला पाहायला मिळाला होता. गोल्ड मेडलसाठी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेवर एकतर्फी विजयाची नोंद केली होती. हे भारताचं आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेतील पहिलंच गोल्ड मेडल होतं. आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने पदकांच्या यादीत आणखी एका गोल्ड मेडलची भर घातली आहे.

भारतीय संघाने उभारला २११ धावांचा डोंगर

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्माची जोडी मैदानावर आली. पण या जोडीला हवी तशी सुरुवात करता आली नाही. वैभव सूर्यवंशी अवघ्या १५ धावा करून माघारी परतला. त्यानंतर संजू सॅमसन अवघ्या २ धावा करून माघारी परतला. पण अभिषेक शर्माने एकहाती किल्ला लढवला.

अभिषेकने ६१ धावांची वादळी खेळी केली. त्याला श्रेयस अय्यरची चांगली साथ मिळाली. श्रेयस अय्यरने २१ धावांचे योगदान दिले. त्यानंतर इशान किशनने २० धावा केल्या. शेवटी तिलक वर्मा आणि शिवम दुबेच्या फटकेबाजीचा बोलबाला पाहायला मिळाला. दोघांनी मिळून चौकार – षटकारांचा पाऊस पाडला. तिलक वर्माने नाबाद ५१ धावा केल्या. तर शिवम दुबेने २१ धावा करून २० षटकात २११ धावांचा डोंगर उभारला.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानला सुरुवातीलाच मोठे धक्के बसले. फरहान अवघ्या १० तर सदाकत २३ धावा करून माघारी परतला. यष्टिरक्षक उस्मान खान ३ धावांवर तंबूत परतला. तर सॅम अयुबने २९ धावांचे योगदान दिले. शेवटी हसन नवाजने एकहाती किल्ला लढवला.