Asian Games 2026 Women Compound Archery Gold: भारताने सुरू असलेल्या २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेत बुधवारी सातवं सुवर्णपदक पटकावलं. महिला कंपाउंड तिरंदाजी संघाने अंतिम फेरीत चीनचा पराभव करत मागील स्पर्धेतील आपलं विजेतेपद कायम राखलं. याशिवाय भारताने २३८ ही विश्वविकमी गुणसंख्या नोंदवत सुवर्णपदक पटकावलं.

ज्योती सुरेखा वेन्नम, पृथिका प्रदीप आणि चिकिता थानिपर्थी यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने अंतिम सामन्यात दमदार कामगिरी केली. भारताने चीनवर २३८-२३४ असा विजय मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरलं.

२०२३ मधील हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेतील विजेतेपद कायम राखताना भारताने या स्पर्धेतील दुसरं सुवर्णपदक जिंकलं. याचबरोबर भारताने २०१४ मध्ये दक्षिण कोरियाने नोंदवलेल्या जागतिक आणि आशियाई विक्रमाची बरोबरी केली.

त्याआधी बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीत भारताची दक्षिण कोरियाशी चुरशीची लढत झाली. भारताने हा सामना २३४-२३३ असा अवघ्या एका गुणाने जिंकला. सामन्याच्या उत्तरार्धात दक्षिण कोरियाने जोरदार पुनरागमन करत गुणसंख्या १७५-१७५ अशी बरोबरीत आणली होती. त्यानंतर भारतीय संघाने एका गुणाची आघाडी घेतली. चिकिता आणि पृथिकाने प्रत्येकी १० गुणांची कामगिरी केली, तर ज्योतीने ९ गुण मिळवत भारताचा एका गुणाने विजय निश्चित केला.

महिला कंपाउंड तिरंदाजी संघाच्या या स्पर्धेला २०१४ मध्ये सुरुवात झाल्यापासून भारताने प्रत्येक आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकलं आहे. २०१४ मध्ये भारताने कांस्यपदक, तर २०१८ मध्ये रौप्यपदक पटकावलं होतं. त्यानंतर भारताने सलग दोन सुवर्णपदकं जिंकली आहेत. ३० वर्षीय ज्योती सुरेखा वेन्नम या चारही पदकविजेत्या भारतीय संघांचा भाग राहिल्या आहेत.

या सुवर्णपदकामुळे भारताने एकूण पदकतालिकेत नवव्या स्थानावर झेप घेतली. मंगळवारी भारताच्या महिला ४x४०० मीटर रिले संघाने अंतिम फेरीत ऐतिहासिक कामगिरी करत देशाला स्पर्धेतील सहावं सुवर्णपदक मिळवून दिलं होतं.

महिला कंपाउंड तिरंदाजीतील भारताचा सुवर्णप्रवास
मंगोलियाचा पराभव — २३८ गुणांसह जागतिक विक्रमाची बरोबरी
कझाकस्तानचा पराभव
दक्षिण कोरियाचा एका गुणाने पराभव
चीनचा पराभव — २३८ गुणांसह जागतिक विक्रमाची बरोबरी