Asian Games 2026, Mens Kabaddi India vs Iran Final: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय कबड्डी संघाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. भारतीय कबड्डी संघाने एकाच दिवशी २ गोल्ड मेडल पटकावले आहेत. फायनलमध्ये भारत आणि इराण हे दोन्ही बलाढ्य संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने इराणवर ४०-३४ ने दमदार विजय मिळवला. यासह सलग दुसऱ्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडलवर नाव कोरलं. सामन्यातील पहिल्या हाफमध्ये भारतीय संघ थोडक्यात पिछाडीवर होता. पण त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये भारतीय खेळाडूंनी दमदार पुनरागमन केलं आणि बलाढ्य इराणवर विजय मिळवला.
पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांमध्ये अटीतटीचा सामना रंगला. इराणने सुरूवातीपासून आक्रमक खेळ केला. पण त्यानंतर भारतीय संघाने दमदार पुनरागमन केलं. पण भारतीय खेळाडू दबाव कायम ठेवण्यात अपयशी ठरले. इराणने भारतीय संघाला ऑलआऊट करत १४-१३ ने आघाडी घेतली. ऑलआऊट झाल्यानंतर भारतीय संघाने पुनरागमन करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण पहिल्या हाफच्या समाप्तीनंतर इराणचा संघ १८-१७ ने केवळ एक गुणाच्या फरकाने आघाडीवर होता.
पहिल्या हाफमध्ये एका गुणाने पिछाडीवर राहिल्यानंतर भारतीय खेळाडूंनी दुसऱ्या हाफमध्ये पुनरागमन केलं. पहिल्या हाफमध्ये पिछाडीवर राहिल्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये भारतीय खेळाडूंनी पुनरागमन केलं. सामना संपायला शेवटची ५ मिनिटे असताना, भारतीय संघाने इराणवर ५ गुणांची आघाडी घेतली. भारताने आघाडी घेतल्यानंतर इराणच्या ताफ्यात टेन्शनचं वातावरण होतं. भारतीय संघाने आघाडी आणखी मजबूत करण्यावर भर दिला. भारतीय संघाने शेवटी ९ गुणांची भक्कम आघाडी घेतली. शेवटी फुल टाईमनंतर भारतीय संघाने हा सामना ४०-३४ गुणांसह ६ गुणांनी विजय मिळवला.
भारतीय महिला संघाने पटकावलं गोल्ड मेडल
भारतीय कबड्डी संघाने एकाच दिवशी डबल धमाका केला आहे. महिला संघाने सकाळच्या सत्रात इराणच्या महिला संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात दणदणीत विजयाची नोंद केली. भारतीय महिला कबड्डी संघाने ३७-३४ च्या फरकाने विजय मिळवला आणि चौथ्यांदा गोल्ड मेडलवर नाव कोरलं.
