NRI Families Came Forward To Help Indian atheletes In Japan: सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्तां हमारा..असं भारतीय अभिमानाने सांगतात. याचा प्रत्यय जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान आला आहे. जपानच्या आयची – नागोयामध्ये आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेदरम्यान जपानने खर्च टाळण्यासाठी खेळाडूंची गैरसोय झाल्याचा प्रकार घडला आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान खेळाडूंना राहण्यासाठी एक स्वतंत्र गाव तयार केलं जातं. जिथे सर्व खेळाडू एकत्र राहतात. पण जपानने खेळाडूंची ३ वेगवेगळ्या ठिकाणी राहण्याची सोय केली आहे. पहिलं म्हणजे हॉटेल, दुसरं म्हणजे कंटेनर स्टाईल रूम्स आणि तिसरं म्हणजे क्रूज. पण भारतीय खेळाडू जपानमध्ये पोहोचताच अधिकृत व्यवस्थेतील एक मोठी त्रुटी समोर आली आहे. ३ वेगवेगळ्या ठिकाणी खेळाडूंची राहण्याची सोय करण्यात आल्याने आधीच खेळाडूंची गैरसोय झाली आहे.
यादरम्यान बॅडमिंटन, शूटिंग आणि इतर काही खेळातील ३० ते ३५ खेळाडूंचं नाव व्यवस्थेच्या यादीतून अचानक गायब झालं. त्यामुळे खेळाडूंना आपला रूम मिळण्यासाठी तासनतास वाट पाहावी लागली. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रायल आणि टोकियोतील भारतीय दूतावासाने एकत्र येऊन त्रिस्तरीय व्यवस्था लागू केली.
विमानतळ सहाय्यता केंद्र
नागोया विमानतळावर येणाऱ्या कुठल्याही भारतीय खेळाडूची गैरसोय होऊ नये आणि खेळाडूंना तत्काळ मदत मिळावी म्हणून विमानतळावर दोन विशेष अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.
खेळाडूंच्या स्वागतासाठी केंद्र
खेळाडूंचे accreditation कार्ड, स्थानिक बस आणि ट्रेन पास संबंधित बाबी हाताळण्यासाठी स्वागत केंद्रावर तीन अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.
स्थानिक भारतीयांची मदत
सर्वात महत्वपूर्ण बाब म्हणजे जपानमध्ये राहणारे प्रवासी भारतीय, भारतीय खेळाडूंच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. भारतीय खेळाडूंची राहण्याची गैरसोय होऊ नये आणि कुठल्याही खेळाडूला अडचण होऊ नये म्हणून २००० NRI कुटुंबांना सज्ज ठेवण्यात आलं आहे.
भारतीय संघाचे शेफ डी मिशन यांनी जपानमधील परिस्थितीबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, “क्रीडा मंत्रालय आणि संघाच्या अधिकाऱ्यांकडून परिस्थिती तातडीने हाताळण्यात आली. तातडीने १८ अतिरिक्त रूम बुक करण्यात आले. यासह १० रूमसाठी आरक्षण देखील मिळवलं आहे. सध्या भारतीय खेळाडूंसाठी आरामदायक हॉटेल आणि खोल्या देण्यात आल्या आहेत.”
क्रीडा मंत्रालयाच्या तत्परतेमेमुळे भारतीय खेळाडूंना दीर्घ काळ वाट पहावी लागली नाही. पण नागोयामध्ये राहणाऱ्या भारतीयांनी एकतेची ताकद संपूर्ण जगाला दाखवून दिली आहे. अजूनही त्यांच्या घराबाहेर खेळाडूंच्या स्वागताचे बोर्ड आहेत. या कृतीच सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
