Kumkum Mohod Won Gold: अमरावतीच्या कुमकुम मोहोडने जपानमध्ये इतिहास घडवला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने महिलांच्या एकेरी रिकर्व प्रकारात दक्षिण कोरियाच्या येजिन ओहला शूट ऑफमध्ये पराभूत करून सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. फायनलमध्ये तिने ६-५ ने विजयाला गवसणी घातली आहे. १९७८ नंतर भारताला या प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घालता आली नव्हती. आता ४८ वर्षांनंतर कुमकुमने ही प्रतीक्षा संपवत भारताला पहिलं पदक जिंकून दिलं आहे.
फायनलमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. २ सेट झाल्यानंतर कुमकुम ३-१ ने पिछाडीवर होती. पण त्यानंतर कुमकुमने दमदार पुनरागमन केलं आणि स्कोअर ३-३ ने बरोबरीत आणला. त्यानंतर येजिनने पुन्हा एकदा आघाडी घेतली. येजिनने ५-३ ने आघाडी घेतली. पाचव्या सेटमध्ये कुमकुमने ३ परफेक्ट १० मारले आणि स्कोअर ५-५ ने बरोबरीत आणला. त्यामुळे सामन्याचा निकाल शूट ऑफमध्ये गेला. शूट ऑफमध्ये येजिनने ८ गुणांची कमाई केली. तर कुमकुमने परफेक्ट १० वर निशाणा साधला आणि शूट ऑफमध्ये भारताला पहिलं ऐतिहासिक पदक जिंकून दिलं. हे भारताचे या स्पर्धेतील १७ वे सुवर्णपदक आहे.
कुमकुमने आशियाई क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. हे तिचे या स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक आहे. याआधी तिने अंकिता भकत आणि किर्ती शर्माने महिलांच्या रिकर्व टीम इव्हेंटमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. यासह धीरज बोम्मदेवरासोबत मिळून मिश्र रिकर्व प्रकारात तिने रौप्यपदकाला गवसणी घातली होती.
आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजांनी नेहमीप्रमाणे दमदार कामगिरी केली. आतापर्यंत तिरंदाजीत भारताने ५ सुवर्णपदक पटकावले आहेत. एकूण ८ पदकांमध्ये ५ सुवर्ण, २ रौप्य आणि १ कांस्य पदकाचा समावेश आहे.
