Asian Games 2026 Mens Cricket Final Rain Rules Gold Medal: भारताच्या महिला क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये सुवर्णपदक पटकावलं. यानंतर आता भारताचा पुरूष क्रिकेट संघ सुवर्णपदक पुन्हा आपल्या नावे करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघाचा अफगाणिस्तानविरूद्धचा उपांत्यपूर्व फेरीतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला आहे. यानंतर भारतीय संघ थेट उपांत्य फेरीत पोहोचला आहे. पण जर अंतिम सामन्यातही पावसाने धुमाकूळ घातला, तर कोणत्या संघाला सुवर्णपदक मिळणार जाणून घेऊया.

आज म्हणजेच २८ सप्टेंबरला भारतीय पुरूष क्रिकेट संघाचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना खेळवला जाणार होता. पण सातत्यपूर्ण पावसामुळे नाणेफेक न होताच सामना रद्द करण्यात आला. तर आयसीसी टी-२० क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानी असल्याने अफगाणिस्तान संघाला मागे टाकत उपांत्य फेरीत धडक मारली. भारत पुढील फेरीत गेल्याने अफगाणिस्तान संघाचा स्पर्धेतील प्रवास थांबला.

यंदाच्या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश यांनी उपांत्यपूर्व फेरीत थेट स्थान मिळवलं, तर इतर संघांना त्या फेरीसाठी पात्र ठरण्याकरिता गट-स्तरीय सामने खेळावे लागले. मात्र, उपांत्यपूर्व फेरीची सुरुवात पावसाने झाली आणि परिस्थिती बदलली. भारत आणि पाकिस्तानचे उपांत्यपूर्व सामने सोमवार, २८ सप्टेंबर रोजी होणार होते, परंतु पावसामुळे दोन्ही सामने रद्द झाले.

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या नियमांनुसार, संघांना आयसीसी (ICC) रँकिंगच्या आधारे मानांकन दिले जाते आणि ज्या संघाचे मानांकन उच्च असते, तो संघ पुढील फेरीत प्रवेश करतो. या दोन्ही सामन्यांमध्ये भारत आणि पाकिस्तानचे मानांकन त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा वरचे होते, त्यामुळे ते कोणताही सामना न खेळताच उपांत्य फेरीत पोहोचले. पुढील दोन उपांत्यपूर्व सामन्यांमध्येही अशीच परिस्थिती उद्भवू शकते.

त्याचप्रमाणे, उपांत्य फेरीचा निकालही ‘सीडिंग’च्या (मानांकनाच्या) आधारावरच निश्चित केला जाईल. इतर संघांच्या तुलनेत भारतीय संघाचे मानांकन अधिक चांगलं आहे, त्यामुळे तो संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल.

अंतिम सामन्यात पावसाने हजेरी लावल्यास सुवर्णपदक कोणाला मिळणार?

यापूर्वीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील अंतिम सामना पावसामुळे रद्द झाला होता तेव्हा; भारत आणि अफगाणिस्तान हे संघ अंतिम फेरीत होते आणि सरस मानांकनामुळे भारताला सुवर्णपदक मिळालं होतं. मात्र, यावेळी तसं होणार नाही कारण नियमात बदल करण्यात आला आहे. मागील स्पर्धेच्या अंतिम सामन्यादरम्यान या नियमावर बरीच टीका झाली होती. म्हणूनच यावेळी असा बदल करण्यात आला आहे, जो आयसीसीच्या (ICC) नियमांशी सुसंगत आहे आणि दोन्ही संघांसाठी योग्य ठरतो. नवीन नियमांनुसार, जर अंतिम सामना पावसामुळे रद्द झाला, तर दोन्ही संघांना सुवर्णपदक दिले जाईल.