Asian Games 2026 Shooting Gold Suruchi Singh Kamaljeet: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला दुसरं सुवर्णपदक मिळालं आहे. भारताच्या नेमबाजांनी आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत भारताला अनेक पदकं मिळवून दिली, पण सुवर्णपदकाच्या जवळ येऊन नेमबाजांना माघारी परतावं लागत होतं. पण आता अखेरीस भारताच्या उत्कृष्ट नेमबाजी जोडी १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकावलं आहे. सुरूची सिंह व कमलजीत यांनी सुरूवातीपासून पहिलं स्थान कायम ठेवत अखेर सुवर्णपदकाला गवसणी घातली.

शुक्रवारचा दिवस नेमबाजीत भारतासाठी कमालीचा दिवस ठरला. सुरुची सिंह आणि कमलजीत यांनी १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं, तर ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर, रुद्रांक्ष पाटील आणि नीरज कुमार यांना ५० मीटर रायफल ३ पोझिशन्स सांघिक स्पर्धेत स्टँडिंग राउंडमधील महत्त्वपूर्ण गुण गमावल्यामुळे थोडक्यात विजेतेपदापासून दूर राहावं लागलं.

सुरुची आणि कमलजीत यांची जोडी शेवटच्या क्षणी तयार करण्यात आली होती. मात्र, वैयक्तिक स्पर्धांमध्ये आलेल्या निराशेनंतर मिळालेल्या या दुसऱ्या संधीचं त्यांनी सुवर्णपदकात रूपांतर केलं आणि भारताला दिवसातील शूटिंगमधील सुवर्णपदक मिळवून दिलं. या विजयासह महिला क्रिकेट संघाच्या सुवर्णपदकानंतर नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचं हे दुसरं सुवर्णपदक ठरलं.

सुरूची कमलजीत सुरूवातीपासून पहिल्या स्थानी अन् सुवर्ण कामगिरी करत विजयी

सुरुची आणि कमलजीत यांनी दमदार कामगिरी करत ४८४.६ गुणांसह १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेचं सुवर्णपदक जिंकलं. भारतीय जोडीने दुसऱ्या स्थानावर असलेल्या दक्षिण कोरियाच्या चू गाएउन आणि हाँग सुह्यॉन या जोडीवर तब्बल ६.६ गुणांची आघाडी घेतली. विशेष म्हणजे, पात्रता फेरीतही भारतीय जोडी ५८७ गुणांसह अव्वल ठरली होती.

सुरुचीसाठी हे सुवर्णपदक विशेष महत्त्वाचं ठरलं. स्पर्धेच्या सुरुवातीलाच तिला महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत प्रवेश करता आला नव्हता. कमलजीत तर पुरुषांच्या स्पर्धेत अंतिम फेरीच्या अगदी जवळ पोहोचला होता. तो नवव्या स्थानावर राहिला आणि अंतिम फेरीपासून केवळ एका गुणाने दूर राहिला. पण या दोघांना दुसरी संधी मिळाली आणि त्यांनी सुवर्णकामगिरी केली.

५० मीटर एअर रायफल स्पर्धेत भारताला रौप्यपदक

या सुवर्णपदकामुळे भारताच्या शूटिंग संघाचा उत्साह वाढला. दुसरीकडे ५० मीटर रायफल ३ पोझिशन्स सांघिक स्पर्धेत ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर, रुद्रांक्ष पाटील आणि नीरज कुमार यांना रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. भारतीय संघाने चीनपेक्षा चार गुण कमी मिळवले. चीनने १,७६६ गुणांसह सुवर्णपदक पटकावलं. भारतीय त्रिकूटाने निलिंग आणि प्रोन राउंडनंतर चांगली स्थिती निर्माण केली होती, मात्र स्टँडिंग राउंडमध्ये त्यांच्या गुणांमध्ये घसरण झाली. त्यामुळे आघाडीवर असलेल्या संघांना अंतर कमी करण्याची संधी मिळाली आणि अखेरीस भारताचं सुवर्णपदक हुकलं.

स्टँडिंग पोझिशन ही या स्पर्धेतील अंतिम आणि सर्वात आव्हानात्मक फेरी मानली जाते. प्रोन पोझिशनप्रमाणे रायफलला आधार नसल्याने नेमबाजांना स्वतःचा तोल सांभाळत रायफलवर नियंत्रण ठेवावं लागतं. अंतिम फेरीच्या आधी ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर आघाडीवर होता. मात्र, शेवटच्या दोन सिरीजमध्ये त्याने ९७ आणि ९५ गुण मिळवल्याने तो घसरून तिसऱ्या स्थानावर पोहोचला. रुद्रांक्ष पाटीलनेही अखेरच्या दोन सिरीजमध्ये ९७ आणि ९६ गुणांची नोंद केली आणि त्यामुळे तो नवव्या स्थानावर घसरला.