India vs Srilanka Semi Final: भारतीय संघ सध्या जपानमध्ये आहे. आयची-नागोयामध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेला पराभूत करून जेतेपदाचा मान मिळवला. आता भारतीय पुरुष क्रिकेट संघालाही जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. भारतीय संघाला थेट क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश मिळाला होता. क्वार्टरफायनलमध्ये भारतीय संघाचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध होणार होता, पण पावसाने हजेरी लावल्याने हा सामना रद्द करण्यात आला. त्यामुळे भारतीय संघाला थेट सेमीफायनलचं तिकीट मिळालं आहे. दरम्यान भारतीय संघाचा सेमीफायनलचा सामना कधी आणि कोणत्या संघाविरुद्ध होणार? जाणून घ्या.

भारतीय संघाचा सेमीफायनलचा सामना श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. या स्पर्धेतील क्वार्टर फायनलचा सामना श्रीलंका आणि नेपाळ या दोन्ही संघांमध्ये होणार होता. पण या सामन्यादरम्यान देखील पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हा सामना देखील रद्द करण्यात आला आहे. आता फायनलमध्ये जाण्यासाठी भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये झुंज पाहायला मिळणार आहे. तर हा सामना गमवणारा संघ कांस्यपदकाचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्यामुळे भारतीयच संघ आता सुवर्णपदकापासून केवळ २ पाऊन दूर आहे.’

भारत-श्रीलंका सेमीफायनल सामना केव्हा होणार?

नेपाळ आणि श्रीलंका यांच्यातील क्वार्टरफायनलचा सामना पावसामुळे रद्द होताच हे स्पष्ट झालं की, श्रीलंकेचा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. तर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना रद्द झाल्यानंतर सेमीफायनलचं चित्र स्पष्ट झालं आहे. भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये होणारा सेमीफायनलचा सामना १ ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. तर जपानच्या स्थानिक वेळेनुसार, हा सामना दुपारी १:३० वाजता सुरू होईल.

या स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट संघाला आतापर्यंत एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. आयसीसी रँकिंगच्या बळावर भारतीय संघाने थेट क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर क्वार्टरफायनलचा सामना पावसामुळे रद्द झाला. याआधी भारतीय महिला संघाने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये झालेल्या फायनलमध्ये भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २१६ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेला श्रीलंकेचा संघ अवघ्या ६९ धावांवर आटोपला होता. यासह भारतीय संघाने १४७ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला होता.