हॉकी : भारतीय महिलांचा थायलंडवर सहज विजय

भारतीय महिला हॉकी संघाने विजयी सलामी नोंदवताना थायलंडचा ३-० असा सहज पराभव केला. पूनम राणी (१५वे मिनिट), वंदना कटारिया (३९वे मिनिट), दीपिका कुमारी (५३वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल करीत भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.

भारतीय महिला हॉकी संघाने विजयी सलामी नोंदवताना थायलंडचा ३-० असा सहज पराभव केला. पूनम राणी (१५वे मिनिट), वंदना कटारिया (३९वे मिनिट), दीपिका कुमारी (५३वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल करीत भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.  
एकतर्फी झालेल्या लढतीत भारताने किमान दहा गोलांच्या फरकाने विजय मिळविला असता. त्यांना गोल करण्याची २२ वेळा संधी लाभली. मात्र अचूकतेच्या अभावी त्यांनी मोठा विजय नोंदविण्याची संधी वाया घालविली. अनुभवी खेळाडू राणी रामपाल हिने गोल करण्याच्या सहा संधी दवडल्या. भारताची साखळी गटात आता चीन संघाबरोबर २४ सप्टेंबर रोजी गाठ पडणार आहे. त्यानंतर त्यांची मलेशियाविरुद्ध २६ सप्टेंबर रोजी लढत होईल. दरम्यान, सलामीला श्रीलंकेवर एकतर्फी मात केल्यानंतर भारताला पुरुष हॉकीत ओमानविरुद्ध दणदणीत विजय मिळविण्याची संधी आहे. चीन (२५ सप्टेंबर) व पाकिस्तान (२७ सप्टेंबर) या दोन लढतींपूर्वी मनोधैर्य उंचावण्यासाठी ओमानविरुद्धचा सामना भारतासाठी फलदायी ठरणार आहे. पहिल्या लढतीत झालेल्या चुका दुरुस्त करण्याची संधी या सामन्यात भारताला मिळणार आहे. लंकेविरुद्ध सहज विजय मिळविला असला, तरी भारताने या सामन्यात गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालविल्या होत्या. ‘‘ओमानविरुद्ध निर्विवाद वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न आमचे खेळाडू करतील. पहिल्या सामन्यातील उणिवा दूर करण्यावर या सामन्यात भर दिला जाईल,’’ असे भारताचे मुख्य प्रशिक्षक टेरी वॉल्श यांनी सांगितले. श्रीलंकेविरुद्ध हॅट्ट्रिक करणारा रुपिंदरपाल सिंग व रमणदीप सिंग यांच्यासह कर्णधार सरदारा सिंगवर भारताची भिस्त राहणार आहे.

ज्युदो  : झोळी रिकामीच
भारतीय ज्युदो खेळाडूंची स्पर्धेत पदकांची झोळी रिकामीच राहिली आहे. महिला ज्युदोपटू रजविंदर कौरला कझाकिस्तानच्या नगिरा सराबाशोव्हाने २ मिनिटे आणि ११ सेकंदामध्ये पराभूत केले. यापूर्वी महिलांमध्ये लिकमाबाम सुशीला देवी, थोऊडाम कल्पना देवी आणि पुरुषांमध्ये नवज्योत चाना यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.

टेनिस : भारताचे आव्हान संपुष्टात
भारतीय पुरुष आणि महिला टेनिस संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यामुळे पदकांच्या आशा मावळल्या आहेत. कझाकिस्तानने भारताच्या दोन्ही संघांचा २-१ असा पराभव केला. पुरुषांच्या सलामीच्या सामन्यात सोनम सिंगने अलेक्झांडर नेडोव्हीइसोव्हचा ६-७ (५), ६-७ (३) असा पराभव करत चांगली सुरुवात करून दिली. पुरुषांच्या दुसऱ्या सामन्यात युकी भांब्रीला मिखाइल कुकुशकिनने ६-२, ७-६ (६), ६-१ असे पराभूत केले. दुहेरीमध्ये साकेत मिनेनी आणि दिव्हिज शरण यांच्यावर आंद्रे गोलुबेव्ह आणि अलेक्झांडर नेडोव्हीइसोव्ह यांनी ७-५, ७-५ असा विजय मिळवला.
महिलांमध्ये सलामीच्या लढतीमध्ये प्रार्थना ठोंबरेला युलिया पुटिन्टसेव्हाने ६-३, ६-२ असे पराभूत केले. दुसऱ्या सामन्यात अंकिता रैनावर यारोस्लाव्हा श्वेडोव्हाने ७-५, ७-६ (३) असा विजय मिळवला. दुहेरीमध्ये कझाकिस्तानच्या युलिया पुटिन्टसेव्हा आणि कमिला केरिम्बायेव्हा यांनी माघार घेतल्यामुळे भारताला एक गुण मिळाला.

जलतरण : नायर अंतिम फेरीसाठी अपात्र
भारताचे जलतरणातील पराभवाचे पाढे सुरूच असून सोमवारी प्रथापन नायरला ५० मी. बॅकस्ट्रोक प्रकारामध्ये सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले असून तो अंतिम फेरीसाठी अपात्र ठरला आहे. नायरने ५० मी. अंतर २६.८५ सेकंदांमध्ये पूर्ण केले. रविवारी नायरला १०० मी. बॅकस्ट्रोक प्रकारात सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.

जिम्नॅस्टिक : कलात्मक प्रकारात भारत आठवा
कलात्मक जिम्नॅस्टिक क्रीडा प्रकारातील महिलांच्या वैयक्तिक पात्रता आणि सांघिक अंतिम फेरीत भारताला आठव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. राष्ट्रकुलक कांस्यपदक विजेत्या दीपा कर्माकरने भारतीय महिलांमध्ये सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. भारताने चार गटांमध्ये १७९.६२५ गुणांची कमाई केली. अव्वल ठरलेल्या चीनने २२९.३०० गुण मिळवले.

व्हॉलीबॉल : जपानकडून पराभव
भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाला जपानने ३-० असे पराभूत केले. पहिल्या सामन्यात भारताला यजमान दक्षिण कोरियाने पराभूत केले होते. त्यानंतर या दुसऱ्या सामन्यात जपानने भारतावर २५-६, २५-११, २५-१२ असा ५६ मिनिटांमध्ये विजय मिळवला. भारताकडून निर्मलाने सर्वाधिक नऊ गुणांची कमाई केली, तर जपानकडून मारि होरिकावाने सर्वाधिक १० गुण पटकावले. भारताचा पुढचा सामना बुधवारी थायलंडविरुद्ध होणार आहे.

बास्केटबॉल : भारत पुढच्या फेरीत
बास्केटबॉलच्या पात्रता फेरीतील दुसऱ्या सामन्यात भारताने कझाकिस्तानला ८०-६१ असे पराभूत करून पुढील फेरीत प्रवेश केला आहे. भारताने सलामीच्या लढतीत पॅलेस्टाइनवर ८९-४९ असा विजय मिळवला होती. पण रविवारच्या दुसऱ्या सामन्यात भारताला सौदी अरेबियाने ७३-६७ असे पराभूत केले होते. पण तीन पैकी दोन सामने जिंकल्याने भारताने पुढील फेरीत स्थान मिळवले आहे.

सायकलिंग : पुन्हा निराशाच
भारतीय सायकलपटूंनी सोमवारी पुन्हा एकदा निराशाच केली. भारताच्या अमरजित सिंग आणि अमरित सिंग यांना अनुक्रमे १३वे आणि १४वे स्थान मिळाले. अमरजित आणि अमरित यांनी अनुक्रमे १०.९१७ आणि ११.०९१ सेकंदांमध्ये अंतर पूर्ण केले, तर या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या जपानच्या सेलिचिरो नाकागावाने हे अंतर ९.९४२ सेकंदांमध्ये पूर्ण केले.

वुशू : भारताला किमान दोन कांस्यपदकांची खात्री
वुशू क्रीडाप्रकारात थोडाम सांथोई देवी आणि नरेंदर ग्रेवाल यांनी उपांत्य फेरीत मजल मारून भारतासाठी किमान दोन कांस्यपदकांची निश्चिती केली आहे. ५२ किलो वजनी गटातील सांडा प्रकारात सांथोई देवीने मंगोलियाच्या अमागालांजरगल सागिंडोर्जला उपांत्यपूर्व फेरीत २-० असे पराभूत केले. सांथोईचा उपांत्य फेरीत चीनच्या झँग लुआनचा मंगळवारी सामना करावा लागणार आहे. आशियाई स्पर्धेत पदक पटकावणारी सांथोई तिसरी खेळाडू ठरणार आहे.
सायंकाळी ग्रेवालने ६० किलो वजनी गटात पाकिस्तानच्या अब्दुल्लाचा उपांत्यपूर्व फेरीत २-० असा पराभव केला. आता ग्रेवालची उपांत्य फेरीत फिलिपाइन्सच्या जीन क्लाऊडे सॅकलागशी गाठ पडणार आहे. दरम्यान, साजन लांबाला मात्र या स्पर्धेत चांगली कामगिरी करता आली नाही. लांबाचा नानक्युआन प्रकारात नववा आणि नानगुआन प्रकारात १३वा क्रमांक आला आहे.

फुटबॉल : जॉर्डनकडून पराभव; भारतीय पुरुषांचे आव्हान संपुष्टात
उत्कृष्ट सांघिक खेळ करीत जॉर्डन संघाने भारताचा २-० असा सहज पराभव केला. या पराभवामुळे भारतीय पुरुष संघाचे फुटबॉलमधील आव्हान संपुष्टात आले. सुनील छेत्रीच्या भारतीय संघाला अपेक्षेइतके सांघिक कौशल्य दाखविता आले नाही. जॉर्डनने पूर्वार्धात १-० अशी आघाडी घेतली होती. त्यांचा पहिला गोल लैथ अल्बाशतावी याने १७ व्या मिनिटाला केला. उत्तरार्धात मधल्या फळीतील खेळाडू याझीन महंमद युसूफ याने ६६व्या मिनिटाला गोल करीत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. तीन संघांच्या साखळी गटात भारतास पहिल्या लढतीत संयुक्त अरब अमिरातीकडून ०-५ असा दारुण पराभव स्वीकारावा लागला होता.  

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Asian games day 2 as it happened