वृत्तसंस्था, काकामिगाहारा : भारताचे पुरुष आणि महिला हॉकी संघ आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपापल्या मोहिमेला आज, रविवारपासून सुरुवात करणार असून दोन्ही संघांचे सुवर्णपदकासह २०२८च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकसाठी थेट पात्रता मिळवण्याचे ध्येय आहे. सलामीच्या लढतीत भारतीय पुरुष संघासमोर इंडोनेशिया, तर महिला संघासमोर उझबेकिस्तानचे आव्हान असेल.
चार वेळच्या आशियाई
विजेत्या भारतीय पुरुष संघाला नुकत्याच झालेल्या विश्वचषकात आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. आता ही निराशा मागे सारत आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक राखण्याचे भारताचे लक्ष्य असेल. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या स्पर्धेतील सर्वोच्च मानांकनाचा संघ आहे.
भारतीय महिला संघ विश्वचषकात ५२ वर्षांतील सर्वोत्तम पाचव्या स्थानाच्या कामगिरीनंतर आत्मविश्वासाने आशियाई स्पर्धेत उतरणार आहे. प्रशिक्षकपदी शोर्ड मरीन यांच्या पुनरागमनानंतर संघाच्या कामगिरीतही सकारात्मक बदल दिसला आहे.
सलिमा टेटेच्या नेतृत्वाखालील भारताचा ‘ब’ गटात उझबेकिस्तान, इंडोनेशिया, थायलंड, जपान आणि सिंगापूर यांच्यासह समावेश करण्यात आला आहे. बाद फेरीत भारतासमोरील सर्वांत मोठे आव्हान चीनचे असेल. महिला संघ सामना वेळ : सकाळी ७.३० वा., पुरुष संघ सामना वेळ : सकाळी ११.३० वा., थेट प्रक्षेपण : सोनी टेन २, ३, सोनी लिव्ह ॲप.
