नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने सलग दुसऱ्या दिवशी सोनेरी धडाका कायम राखला. शनिवारी पाच सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्यपदके मिळवत भारताने यंदाच्या आपल्या मोहिमेची सांगता केली. भारताने या स्पर्धेत २१ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३७ कांस्य अशी एकूण ८५ पदके मिळवून चौथे स्थान कायम राखले. हांगझो (२०२३) स्पर्धेतही भारत २८ सुवर्ण, ३८ रौप्य आणि ४१ कांस्य अशा एकूण १०७ पदकांसह चौथ्या स्थानावर राहिला होता.
अखेरच्या दिवशी अमरावतीची १७ वर्षीय कुमकुम मोहोड हिने तिरंदाजीच्या रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक जिंकले. या क्रीडा प्रकारात सुवर्ण जिंकणारी ती भारताची पहिली महिला खेळाडू ठरली. त्याचबरोबर एकाच स्पर्धेत दोन सुवर्णपदके आणि एक रौप्यपदक अशी तीन पदके जिंकणारी ती भारताची सर्वांत कमी वयाची खेळाडू ठरली.
भारताला गतस्पर्धेप्रमाणे यंदा पदकांचे शतक गाठण्यात अपयश आले असले, तरी बॉक्सिंग, तिरंदाजी आणि कुस्ती या वैयक्तिक क्रीडा प्रकारांतील सरस कामगिरीमुळे पदकतालिकेत चौथे स्थान कायम राखता आले.
पुरुष आणि महिला हॉकी, क्रिकेट तसेच कबड्डीतील सांघिक सुवर्णपदकांचीही भारताच्या पदकविजयात भर पडली. स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यातील अपयश जिव्हारी लागत असतानाच अखेरच्या टप्प्यात भारताच्या तिरंदाज, कुस्तीपटू आणि बॉक्सरनी भारताच्या यशाचे शिवधनुष्य पेलले. ॲथलेटिक्स आणि नेमबाजी या वैयक्तिक प्रकारांत भारतीय खेळाडूंना सुवर्णयश मिळवता न आल्यामुळे भारताला हांगझोमधील कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही.
ठळक कामगिरी
- हॉकी : भारतीय पुरुष हॉकी संघाने मलेशियाचा ५-१ असा पराभव करून सलग दुसरे सुवर्णपदक मिळवले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील हॉकीचे सुवर्णपदक सलग दोनदा राखणारा भारत हा दुसरा देश ठरला. या यशासह पुरुष संघाने ऑलिम्पिक पात्रताही मिळवली.
- कुस्ती : ऑलिम्पिक पदकविजेता अमन सेहरावत याने ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवून आपली कामगिरी उंचावली. त्याचे हे दुसरे आशियाई पदक ठरले. हांगझो स्पर्धेत त्याने रौप्यपदक पटकावले होते. महिला विभागात अंतिम पंघालला ५३ किलो वजनी गटात मात्र रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
- क्रिकेट : भारतीय पुरुष संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा १९ धावांनी पराभव करून सुवर्णपदक कायम राखले. अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांच्या झंझावाती फलंदाजीने भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.
- गोल्फ : देशात फारशा लोकप्रिय नसलेल्या गोल्फमध्ये प्रणवी उर्स हिने भारताला अनपेक्षित सुवर्णपदक मिळवून दिले. याचबरोबर भारताने या प्रकारात सांघिक रौप्यपदकही पटकावले.
