Asian Games 2026 India Women Recurve Archery Gold Medal Match: अंकिता भकत, कीर्ती आणि कुमकुम अनिल मोहोड या भारतीय त्रिकुटाने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये रिकर्व्ह महिला सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकत इतिहास घडवला. अंतिम फेरीत भारताने बलाढ्य दक्षिण कोरियाचा पराभव करत या प्रकारातील आपलं पहिलंवहिलं सुवर्णपदक पटकावलं. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात भारताने यापूर्वी महिला सांघिक रिकर्व्ह प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेशही केला नव्हता. मात्र, यावेळी भारतीय संघाने थेट अंतिम फेरीत धडक मारत कांग चाएयॉन्ग, ली युनजी आणि ओ येजिन यांच्या दक्षिण कोरियन संघाला पराभूत केलं.

पहिल्या एंडच्या सुरुवातीच्या तीन शॉट्सनंतर भारताने २८-२६ अशी आघाडी घेतली होती. मात्र, एंड संपेपर्यंत ही आघाडी कायम ठेवता आली नाही. कीर्तीचा एक शॉट ७ गुणांवर गेल्याने स्कोअर ५४-५४ असा बरोबरीत आला. त्यानंतर कुमकुमने अप्रतिम १० गुणांचा निशाणा साधत भारताला पिछाडीवर जाण्यापासून वाचवलं. त्यामुळे पहिला एंड १-१ अशा बरोबरीत संपला.

दुसऱ्या एंडमध्ये दक्षिण कोरियाने सुरुवातीच्या तीन प्रयत्नांत १०, ९, ९ गुण मिळवत २८ गुणांची कमाई केली. भारताकडून अंकिताने दुसऱ्या एंडची सुरुवात १० गुणांच्या अचूक निशाण्याने केली. मात्र, कीर्तीचा संघर्ष सुरूच राहिला आणि तिचा शॉट ८ गुणांवर गेला. पुन्हा एकदा कुमकुम भारताच्या मदतीला धावून आली. तिने आणखी एक १० गुणांचा अचूक निशाणा साधत भारताची बरोबरी साधली. त्यामुळे तीन शॉट्सनंतर स्कोअर २८-२८ असा झाला.

तिसऱ्या एंडमध्ये भारताने क्रमात बदल केला आणि कीर्तीने सुरुवात केली. तिने १० गुणांचा अचूक निशाणा साधत मागील चुकांची भरपाई केली. त्यानंतर अंकिता आणि कुमकुमने प्रत्येकी ९ गुण मिळवत भारताला २८-२७ अशी निसटती आघाडी मिळवून दिली. शेवटच्या तीन शॉट्समध्ये दक्षिण कोरियाच्या तिन्ही खेळाडूंनी प्रत्येकी ८ गुण मिळवले. भारताला ही संधी साधायची होती आणि भारतीय तिरंदाजांनी ती साधलीच. ८-९-१० अशी कामगिरी करत भारताने तिसरा एंड ५५-५१ असा जिंकला. त्यामुळे सुवर्णपदकाच्या सामन्यात भारताने ४-२ अशी आघाडी घेतली.

चौथा एंड सुरू होताच दक्षिण कोरियाने ९-९-१० अशी सुरुवात केली. भारताकडून कीर्तीने ९ गुण मिळवले, मात्र अंकिताचा शॉट ८ आणि कुमकुमचा शॉटही ८ गुणांवर गेला. त्यामुळे अंतिम एंडच्या मध्यावर दक्षिण कोरियाने २८-२५ अशी आघाडी घेतली. यानंतर दक्षिण कोरियाने शेवटच्या तीन शॉट्समध्ये ८-९-९ अशी कामगिरी करत एकूण ५४ गुणांपर्यंत मजल मारली. त्यामुळे भारताला सुवर्णपदक जिंकण्यासाठी दोन ९ आणि एक १० असा अचूक निशाणा साधण्याची गरज होती.

कीर्तीने ९ गुणांचा निशाणा साधला. त्यानंतर अंकितानेही ९ गुण मिळवले. आता सुवर्णपदक भारताच्या हातात होतं, पण कुमकुमसमोर अखेरच्या शॉटमध्ये १० गुणांचा निशाणा साधण्याचं आव्हान होतं. तिच्या त्या एका शॉटवर भारताच्या ऐतिहासिक सुवर्णपदकाचा निकाल अवलंबून होता आणि कुमकुमने अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.