लुधियाना : आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पूर्वघोषित ७३ सदस्यीय संघातून विविध कारणांमुळे नीरज चोप्रा, तेजस शिर्से, अभिषेक पाल यांना वगळण्यात आले असून, नव्याने सहा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे आता आशियाई स्पर्धेसाठी ॲथलेटिक्स प्रकारातील भारताचा संघ ७७ सदस्यांचा झाला आहे. घोट्याच्या दुखापतीमुळे तारांकित भालाफेकपटू नीरजला आशियाई स्पर्धेला मुकावे लागणार असल्याने त्याच्या जागी राष्ट्रकुल कांस्यपदक विजेत्या यशवीर सिंहला संधी देण्यात आली आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेदरम्यान दुखापत बळावल्यामुळे तेजसला, तर उत्तेजक सेवन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अभिषेक पालला वगळण्यात आले आहे.  ‘‘अभिषेक उत्तेजक चाचणीत दोषी आढळला. त्याच्या नमुन्यात बंदी घातलेल्या औषधाचे प्रमाण किती होते याला महत्त्व नाही. चौकशी सुरू आहे. परंतु आम्हाला धोका पत्करायचा नाही,’’ असे भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या नियोजन आयोगाचे प्रमुख ललित भानोत यांनी सांगितले.

भारताने यापूर्वी ७३ जणांचा संघ जाहीर केला होता, तेव्हा संघात तेजस आणि अभिषेकचा समावेश होता. आता क्रीडा मंत्रालयाने बदल करताना काही खेळाडूंना वगळून सहा खेळाडूंचा समावेश केला. यामध्ये २०० मीटरमधील धावपटू हरिता भद्रा, मध्यम पल्ल्याचा धावपटू किरण पहल, पोल वॉल्टरमधील सिंधुश्री जी, तिहेरी उडीपटू आशा इलांगो, थाळीफेकपटू सान्या यादव आणि हातोडा फेकपटू प्रवीण कुमार यांचा समावेश आहे.

साबळेसाठी प्रयत्न गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अविनाश साबळे याने ३००० आणि ५००० मीटर अशा दोन्ही शर्यतींत सहभागी होताना पदक मिळवले होते. गेल्या वर्षी पायावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर तो अद्याप स्पर्धात्मक सहभागात फारसा सक्रिय नाही. यानंतरही ३००० मीटर शर्यतीसाठी त्याचा सहभाग निश्चित आहे. ५००० मीटर शर्यतीतही त्याच्या सहभागास मान्यता मिळावी यासाठी भारतीय महासंघ प्रयत्नशील आहे.