भारताच्या किदम्बी श्रीकांत आणि सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी जोडीने आशियाई क्रीडा स्पर्धेतील बॅडिमटनमध्ये अनुक्रमे पुरुष एकेरी व दुहेरीच्या पुढच्या फेरीत आगेकूच केली.
श्रीकांतने पुरुष एकेरीच्या सामन्यात व्हिएतनामच्या फाट ले डुकला २९ मिनिटे चाललेल्या सामन्यात २१-१०, २१-१० असे पराभूत करत दुसऱ्या फेरीत आगेकूच केली. २०२१च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या श्रीकांतचा सामना पुढच्या फेरीत कोरियाच्या ली युन जियुशी होईल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता सात्त्विकसाईराज व चिराग जोडीने पुरुष दुहेरीत हाँगकाँगच्या चो हिन लोंग व लुइ चुन वेइ जोडीला २१-११, २१-१६ असे सरळ गेममध्ये नमवले. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या भारतीय जोडीचा सामना आता इंडोनेशियाच्या रोली कार्नाडो व डॅनियल मार्टिनशी होईल.




मिश्र दुहेरीत साई प्रतीक व तनीषा क्रॅस्टोने मकाऊच्या लियोंग लोग चोंग व वेंग चि एंगला २१-१८,२१-१४ अशा फरकाने पराभूत केले. आता त्यांची गाठ मलेशियाच्या चेन तांग जि व तो ई वेई जोडीशी पडेल. भारताच्या एम आर अर्जुनला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. तर, रोहन कपूरला ताप येत आहे. अर्जुन आणि ध्रुव कपिला जोडीला जपानच्या ताकुरो होकी व युगो कोबायाशी जोडीविरुद्ध सामना मध्येच सोडावा लागला. त्यावेळी भारतीय जोडी ३-१३ अशी पिछाडीवर होती. तर, सिक्की रेड्डी व रोहन यांनाही मलेशियाच्या गोह सुन हुआत व शेवोन लाइ जेमीविरुद्ध पहिल्या दोन मिनिटांनंतरच माघार घ्यावी लागली.