spt888पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तम व्यक्तिकमत्त्वाविषयी खूप ऐकले होते, साहजिकच त्यांच्या भेटीविषयी खूप कुतूहल होते. जेव्हा येथे मंगळवारी सकाळी आम्ही त्यांना भेटलो, तेव्हा पहिल्याच भेटीत आम्ही खूप भारावून गेलो, अशी प्रतिक्रिया आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळविणाऱ्या खेळाडूंनी येथे व्यक्त केली.
दक्षिण कोरियात नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदके मिळविणाऱ्या खेळाडूंना मोदी यांनी आपल्या निवासस्थानी आमंत्रित केले होते. सुवर्णपदक विजेते जितू राय, एम. सी. मेरी कोम, योगेश्वर दत्त यांच्यासह अनेक खेळाडू उपस्थित होते. भारतीय बॉक्सिंग संघाचे प्रशिक्षक गुरुबक्षसिंग हेही या वेळी उपस्थित होते.
या भेटीबद्दल राय म्हणाला की, ‘‘मोदी यांनी केलेल्या मार्गदर्शन आमच्या भावी कारकिर्दीसाठी प्रेरणादायक ठरणार आहे. नेमबाजीत ऑलिम्पिक पदक मिळविण्यासाठी मला सर्व सहकार्य मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. भारतीय नेमबाजी संघातील सर्व खेळाडू या प्रसंगी उपस्थित होते. मोदी यांनी आम्हा सर्व खेळाडूंच्या समस्यांची माहिती घेतली व त्यानुसार क्रीडा खात्याला सूचना केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.’’
हॉकीपटू व्ही. आर. रघुनाथ व मनप्रीतसिंग यांनीही ही भेट अतिशय संस्मरणीय असल्याचे सांगितले. रघुनाथ म्हणाला, भारतीय खेळाडूंना कोणत्या समस्या उद्भवत आहेत. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्यासाठी कोणत्या सुविधा व सवलतींची आवश्यकता आहे, याची सर्व माहिती त्यांनी आमच्याकडून काढून घेतली. देशाच्या कानाकोपऱ्यांत खेळाचा प्रचार व प्रसार झाला पाहिजे आणि त्यासाठी शासनचे सर्व सहकार्य मिळेल अशी खात्री त्यांनी आम्हाला दिली आहे. शालेय स्तरावर हॉकीचा प्रचार करण्यासाठी ते लवकरच योजना आणणार आहेत.
मनप्रीत म्हणाला, पंतप्रधानांची भेट घेण्याचे माझे स्वप्न होते. हे स्वप्न साकार झाल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. हॉकीत देशास पुन्हा जागतिक स्तरावर सर्वोच्च सन्मानाचे स्थान मिळविण्यासाठी मोदी खूप उत्सुक होते. हॉकीसाठी शासनाकडून आर्थिक सहकार्य मिळतच राहील, असे मोदी यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे.