पीटीआय, बीजिंग : चीनमधील ताज्या करोना लाटेत रुग्णसंख्या वेगाने वाढू लागल्यामुळे हांगझो येथे १० ते २५ सप्टेंबर या कालावधीत होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आली आहे. नव्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील, असे संयोजकांकडून सांगण्यात आले.

करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शांघायमध्ये टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेपुढे अनिश्चिततेचे सावट पसरले होते. आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या कार्यकारी समितीची बैठक शुक्रवारी ताश्कंद येथे झाली. या बैठकीत हांगझोमधील परिस्थितीचा आढावा घेऊन सद्य:स्थितीत ही स्पर्धा लांबणीवर टाकणेच योग्य ठरेल, हा निर्णय घेण्यात आला. ६१ क्रीडा प्रकारांचा समावेश असलेल्या आशियाई स्पर्धेत सुमारे ११ हजारांहून अधिक क्रीडापटू सहभागी होणार होते.

candidates chess gukesh beat abasov
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश पुन्हा संयुक्त आघाडीवर; प्रज्ञानंदने नेपोम्नियाशीला बरोबरीत रोखले; कारुआनाकडून विदितचा पराभव
wresters deepak punia sujeet denied entry to asia olympic qualifiers tournament
आशिया ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत दीपक, सुजितला प्रवेश नाकारला! दुबईतील पावसामुळे बिश्केकमध्ये पोहोचण्यास उशीर
economic confidence china japan company
जर्मन कंपन्या चीनमधून पुन्हा जपानमध्ये का जात आहेत?
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?

चीन ऑलिम्पिक समिती आणि हांगझो आशियाई क्रीडा स्पर्धा संयोजन समिती यांच्याशी चर्चा करून आशियाई ऑलिम्पिक परिषदेने आशियाई क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या तारखांबाबत निगडित समित्यांशी चर्चा करून लवकरच घोषणा करण्यात येईल, असे आशियाई ऑलिम्पिक परिषदेने स्पष्ट केले आहे.

जागतिक आव्हाने असतानाही स्पर्धा नियोजित तारखांना व्हाव्यात म्हणून हांगझो संयोजन समितीची तयारी अंतिम टप्प्यात होती; परंतु करोना परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून सर्व संबंधित घटकांनी मिळून हा निर्णय घेतला. पुढे ढकलण्यात आलेली स्पर्धा १९वी आशियाई क्रीडा स्पर्धा म्हणूनच ओळखली जाईल. सर्वाच्या साहाय्याने आम्ही ही स्पर्धा यशस्वी करून दाखवू, असा विश्वास संयोजन समितीने व्यक्त केला.

शांघायमध्ये दैनंदिन रुग्णसंख्येचा विक्रमी आकडा नोंदवला जात आहे. शांघायच्या र्नैऋत्येला १७५ किलोमीटर अंतरावरील झेजियांग प्रांताची हांगझो ही राजधानी आहे. झेजियांगमध्ये गुरुवारी ३,१२४ करोना रुग्णांची नोंद झाली, तर एकाचा मृत्यू झाला. याच परिस्थितीमुळे आशियातील या प्रतिष्ठेच्या स्पर्धेबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे.

आशियाई युवा क्रीडा स्पर्धा रद्द

चीनमधील शँतोऊ येथे २० ते २८ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या तिसऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. २०२५ मध्ये पुढील आशियाई युवा क्रीडा स्पर्धा ताश्कंद (उझबेकिस्तान) येथे होणार आहेत.

भारतीय क्रीडा क्षेत्रातून संमिश्र पडसाद

क्रीडापटूंसाठी निराशाजनक निर्णय – ‘आयओए’

आशियाई स्पर्धा लांबणीवर टाकल्याचा निर्णय काही क्रीडापटूंसाठी निराशाजनक असेल, असे मत भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) नोंदवले आहे. ‘‘कोणत्याही महत्त्वाच्या जागतिक स्पर्धा लांबणीवर टाकल्याचा निर्णय क्रीडापटूंसाठी परिणामकारक असतो. या स्पर्धाचे काही महिन्यांनी किंवा वर्षांने पुन्हा आयोजन होते, तेव्हा त्यांचे वय वाढलेले असते,’’ अशी प्रतिक्रिया भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस राजीव मेहता यांनी व्यक्त केली.

तयारीला अधिक वेळ मिळेल – श्रीजेश

टोक्यो ऑलिम्पिकच्या निमित्ताने लांबणीवर पडलेल्या स्पर्धेचे आव्हान कसे पेलावे, हे आम्ही अनुभवले आहे, असे भारतीय पुरुष हॉकी संघाचा गोलरक्षक पीआर श्रीजेशने सांगितले. ‘‘आशियाई स्पर्धेच्या तारखांच्या दृष्टीने क्रीडापटूंनी तयारीला आधीपासूनच सुरुवात केली होती; परंतु चीनमधील सध्याच्या करोना साथीच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा लांबणीवर पडण्याची शक्यता होती. कारण काही बाबी आपल्या नियंत्रणात नसतात; परंतु सकारात्मक पद्धतीने विचार केल्यास क्रीडापटूंना तयारीसाठी अधिक वेळ मिळेल. आशिया चषक, प्रो लीगचे बेल्जियममधील सामने, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि विश्वचषक स्पर्धा अशी असंख्य आव्हाने भारतीय हॉकी संघापुढे आहेत,’’ असे श्रीजेशने म्हटले आहे. आशियाई स्पर्धेतील पुरुष आणि महिला गटातील विजेत्या संघांना २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी थेट प्रवेश मिळतो.

टेनिस संघटनेकडून निर्णयाचे स्वागत

आशियाई स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय अखिल भारतीय टेनिस संघटनेसाठी अनुकूल ठरणार आहे. कारण नॉर्वेविरुद्धची डेव्हिस चषक लढत ही आशियाई स्पर्धेदरम्यान १६-१७ किंवा १७-१८ सप्टेंबरला होणार आहे. ‘‘हा निर्णय स्वागतार्ह आहे. सात दिवसांच्या अंतराने दोन मोठय़ा स्पर्धा खेळण्याचे दडपण आता आमच्यावर नसेल. त्यामुळे दोन्ही स्पर्धासाठी सर्वोत्तम संघ आम्ही पाठवू शकू. आता प्रथम डेव्हिस चषक आणि नंतर आशियाई स्पर्धेची योग्य तयारी करू,’’ असे भारतीय टेनिस संघटनेचे सरचिटणीस अनिल धुपर यांनी सांगितले.

अ‍ॅथलेटिक्सपटूंना दिलासा – सुमारीवाला

आशियाई स्पर्धा लांबणीवर पडल्याने अ‍ॅथलेटिक्सपटूंना दिलासा मिळाला आहे, असे मत भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी व्यक्त केले. ‘‘राष्ट्रकुल, जागतिक अजिंक्यपद आणि आशियाई स्पर्धाची आव्हाने एकापाठोपाठ एक अ‍ॅथलेटिक्सपटूंवर होती. या प्रत्येक स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी दाखवण्याचे आव्हान त्यांच्यापुढे होते. आशियाई स्पर्धा पुढे ढकलल्याचा काही अ‍ॅथलेटिक्सपटूंना फटका बसेल; परंतु बऱ्याच जणांना त्याचा फायदा होईल,’’ असे सुमारीवाला यांनी सांगितले.

चीनमधील दोन डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा रद्द

मोनॅको : करोना रुग्णसंख्या वाढल्यामुळे चीनमधील दोन डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा शुक्रवारी रद्द करण्यात आल्या आहेत. याऐवजी पोलंडमध्ये एका स्पर्धेचा कार्यक्रमपत्रिकेत समावेश करण्यात आला आहे. चीनमधील प्रवेशासाठी लागू करण्यात आलेले प्रवास निर्बंध आणि कडक विलगीकरणाचे नियम या पार्श्वभूमीवर शांघाय आणि शेनझेन येथील स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत, असे संयोजकांनी सांगितले.

पुन्हा योजनाबद्ध तयारीचे आव्हान – साजन

आता आणखी एक वर्ष योजनाबद्ध तयारीचे आव्हान पेलावे लागणार आहे, अशी प्रतिक्रिया जलतरणपटू साजन प्रकाशने व्यक्त केली आहे. ‘‘ज्या जलतरणपटूंनी ऑलिम्पिकच्या दृष्टीने तयारी केली आहे, त्यांच्यासाठी फारसा फरक पडणार नाही; परंतु आशियाई स्पर्धेचे लक्ष्य बाळगणाऱ्यांना पुन्हा तयारी करावी लागेल,’’ असे साजन म्हणाला.

सायनासाठी आशेचा किरण

आशियाई क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याने भारताची नामांकित बॅडिमटनपटू आणि लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालसाठी आशेचा किरण ठरण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी होण्याची शक्यता असलेल्या आशियाई स्पर्धासाठी भारतीय बॅडिमटन संघटनेकडून पुन्हा एकदा निवड चाचणी घेण्यात येणार असून, त्यातून संघाची निवड करण्यात येणार आहे. आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धासाठी निवड चाचण्या १५ ते २० एप्रिल या कालावधीत झाल्या. परंतु सायनाने या स्पर्धामधून माघार घेतली होती. मात्र, आता आशियाई स्पर्धा पुढे ढकलल्याने सायनाला यासाठी आणखी एक संधी मिळाली आहे.