एकीकडे आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आढावा बैठकीत क्रीडा मंत्रालयाने भारतीय पथकाच्या एकंदर कामगिरीबाबत नाराजी व्यक्त केली, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडूंची गुरुवारी भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी मोदी यांनी २०३६ ऑलिम्पिकच्या यजमानपदाच्या महत्त्वाकांक्षेचा पुनरुच्चार केला.
नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या गेल्या आवृत्तीच्या तुलनेत यंदा भारताची पदकसंख्या घटली. याबाबत गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीत क्रीडा मंत्रालयाने नाराजी व्यक्त करतानाच ॲथलेटिक्स आणि बॅडमिंटनमधील घसरण, तसेच स्पर्धापूर्व तयारीतील त्रुटींवर प्रश्न उपस्थित केले. काही प्रमुख खेळाडू जायबंदी असतानाही त्यांना स्पर्धेसाठी पाठवण्यात आल्याच्या मुद्द्यावरही बोट ठेवण्यात आले. आगामी लॉस एंजलिस ऑलिम्पिक आणि आशियाई स्पर्धांसाठी आतापासून नियोजन करण्याचे निर्देशही राष्ट्रीय क्रीडा महासंघांना देण्यात आल्याचे समजते.
केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्ष पी. टी. उषा, क्रीडा सचिव हरी रंजन राव, लक्ष्य ऑलम्पिक व्यासपीठ योजनेचे (टॉप्स) मुख्य कार्यकारी अधिकारी एन. एस. जोहल, तसेच विविध राष्ट्रीय क्रीडा महासंघांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जपानमधील आइची-नागोया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने २१ सुवर्णपदकांसह एकूण ८५ पदके मिळवली. मात्र, हांगझो येथे झालेल्या गेल्या स्पर्धेत भारताने १०६ पदकांची कमाई केली होती. त्या तुलनेत यंदाच्या पदकसंख्येत झालेली घट भारतीय क्रीडाक्षेत्रासाठी चिंतेचा विषय ठरली आहे. सरकारकडून निधी आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असताना महासंघांनी प्रत्यक्ष कामगिरीतून परिणाम दाखवावेत, असे मांडविया यांनी स्पष्ट केले.
दुखापतींचे व्यवस्थापन
अडथळ्यांच्या शर्यतीतील ज्योती याराजी आणि तिहेरी उडीतील प्रवीण चित्रवेल यांच्या दुखापतींचा मुद्दा बैठकीत उपस्थित झाला. ‘आयओए’च्या अध्यक्ष पी. टी. उषा यांनी ॲथलेटिक्स महासंघाच्या कामगिरीच्या आढाव्यादरम्यान हा प्रश्न मांडल्याचे समजते. मात्र, विशिष्ट खेळाडूंच्या प्रकरणांऐवजी एकूण कामगिरीचे विश्लेषण करण्यावर क्रीडामंत्र्यांनी भर दिला. दुखापतींचे अधिक चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन आवश्यक असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले. लांब पल्ल्याचा धावपटू अविनाश साबळे याच्या तंदुरुस्तीबाबतही प्रश्न उपस्थित झाले. ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतीत चौथे स्थान मिळवल्यानंतर त्याने ५००० मीटर शर्यतीतून माघार घेतली.
ॲथलेटिक्स, बॅडमिंटनमध्ये निराशा
ॲथलेटिक्समधील भारताची सुवर्णपदकांची संख्या सहावरून एकावर घसरली, तर एकूण पदके २४ मिळाली. बॅडमिंटनमध्ये भारताला केवळ पुरुषांच्या सांघिक प्रकारात कांस्यपदक मिळाले. कमी कालावधीत अनेक सामने खेळावे लागल्याने खेळाडूंवर परिणाम झाल्याचे आढावा बैठकीत सांगण्यात आले. नेमबाजीतील अपयश आणि आवश्यक सुधारणा याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.
‘आणखी दहा मीराबाई चानू घडवा’
खेळाडूंची नवी पिढी घडवण्यावर भर देताना क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी प्रत्येक राष्ट्रीय क्रीडा महासंघाला युवा गुणवान खेळाडू शोधण्याची आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन केले. ‘‘मीराबाई चानू एकटी किती काळ आपल्यासाठी पदके जिंकत राहणार? आपल्याला आणखी दहा मीराबाई चानू घडवण्याची गरज आहे. प्रत्येक महासंघाने ही जबाबदारी घेतली पाहिजे,’’ असे मांडविया यांनी स्पष्ट केले.
७०० कोटींपेक्षा अधिक खर्च…
* आशियाई स्पर्धेपूर्वी खेळाडूंच्या तयारीसाठी तीन वर्षांच्या कालावधीत ७०० कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आल्याचे क्रीडा मंत्रालयाने सांगितले होते. भारताने या स्पर्धेसाठी ५०१ खेळाडूंचे मोठे पथक पाठवले होते.
* सरकारकडून आवश्यक निधी आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असताना त्याचे रूपांतर प्रत्यक्ष मैदानावरील यशात झाले पाहिजे, अशी भूमिका केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी मांडल्याचे बैठकीला उपस्थित असलेल्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले.
* भारताने २०२८च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकसाठी आतापासूनच नियोजन सुरू करावे, असे निर्देश बैठकीत देण्यात आले. त्याच बरोबर २०३०मध्ये दोहा येथे होणार्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने पहिल्या तीन देशांमध्ये स्थान मिळवण्याचे लक्ष्य ठेवावे, असे क्रीडा सचिव हरी रंजन राव यांनी सांगितले.
