वृत्तसंस्था, हांगझो : ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कार विजेता रुद्रांक्ष पाटील, दिव्यांश सिंह पन्वर आणि ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर यांच्या भारतीय संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारातील सांघिक विभागात विश्वविक्रमासह सुवर्णपदकाची कमाई केली. सोमवारी, स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताला नेमबाजीत एकूण तीन पदके मिळाली. वैयक्तिक प्रकारात ऐश्वर्य प्रताप सिंह तोमरने चुरशीच्या लढतीनंतर शूट-ऑफमध्ये कांस्यपदक मिळवले. पाठोपाठ पुरुषांच्याच २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकाराच्या सांघिक विभागात भारताने कांस्यपदक पटकावले.
यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकाचे खाते उघडून देताना ठाणेकर रुद्रांक्ष, दिव्यांश आणि ऐश्वर्य या त्रिकुटाने पात्रता फेरीतच १८९३.७ गुणांसह चीन आणि दक्षिण कोरियाचे तगडे आव्हान परतवून लावले. रुद्रांक्षने यापूर्वी जागतिक स्पर्धेत सुवर्णपदकासह ‘ऑलिम्पिक कोटा’ मिळवला आहे. वयाच्या १९व्या वर्षीच कमालीची प्रगल्भता दाखवणाऱ्या रुद्रांक्षने ६३२.५, तोमरने ६३१.६, तर दिव्यांशने ६२९.६ गुणांची कमाई करताना एकत्रित जागतिक विक्रमाचाही वेध घेतला. कोरियाला (१८९०.१) रौप्य, तर चीनला (१८८८.२) कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.




‘‘स्पर्धा सोपी नव्हती. आमच्यासमोर आव्हान कठीण होते. सुवर्णपदक जिंकल्याचा आनंद आहेच, पण त्यापेक्षा चीनला हरवले याचा आनंद अधिक आहे,’’ असे ऐश्वर्य तोमर म्हणाला. सांघिक प्रकारात रुद्रांक्ष आणि दिव्यांशने अचूक वेध घेतला. वैयक्तिक प्रकारात दिव्यांश अपयशी ठरला. रुद्रांक्ष तिसऱ्या क्रमांकाने, तर ऐश्वर्य पाचव्या क्रमांकाने मुख्य फेरीत दाखल झाला. दिव्यांश आठवा आला. जागतिक अजिंक्यपद, विश्वचषक स्पर्धावगळून अन्य एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एकाच वेळी तीन भारतीय प्रथमच अंतिम फेरीत खेळले.
मुख्य फेरीत संघ रुद्रांक्षबरोबर झालेल्या तीव्र चढाओढीनंतर शूट-ऑफमध्ये ऐश्वर्यने २२८.८ गुणांसह कांस्यपदक आपल्या नावे केले. ऐश्वर्यला रौप्यपदकाची संधी होती. मात्र, कोरियाच्या पार्क हजूनने कामगिरी उंचावताना ऐश्वर्यला रौप्यपदकाच्या शर्यतीतून बाहेर काढले. चीनच्या शेंग लिहाओने २५३.३ गुणांसह सुवर्णपदकाची कमाई केली. पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकाराच्या सांघिक विभागात अनिश भानवाला, विजयवीर सिद्धू आणि आदर्श सिंह या त्रिकुटाने कांस्यपदक मिळवले.