भारताचा कुस्तीपटू आणि माजी विजेता बजरंग पुनियाला यंदाच्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदकावर समाधान मानावं लागलेलं आहे. बजरंग पुनियाने ६५ किलो फ्रिस्टाईल वजनी गटात तर विनोद कुमार ओमप्रकाशने ७० किलो फ्रिस्टाईल वजनी गटात भारतासाठी कांस्यपदकाची कमाई केली. या दोन पदकासह भारताने आतापर्यंत या स्पर्धेत ८ पदक कमावली आहेत, ज्यात एक सुवर्ण, एक रौप्य आणि ६ कांस्य पदकांचा समावेश आहे.

अवश्य वाचा – नवज्योतचा सोनेरी इतिहास

२०१७ साली नवी दिल्लीत झालेल्या स्पर्धेत बजरंग पुनियाने सुवर्णपदकाची कमाई केली होती. मात्र यंदाच्या स्पर्धेत जपानच्या डायची टकाटनीने बजरंगला ७-५ अशा फरकाने हरवलं. मात्र रेपिचाच प्रकारात बजरंगला कांस्यपदकासाठी लढण्याची संधी मिळाली, ज्यात बजरंगने कोणतीही कसर न ठेवता कांस्यपदक भारताच्या नावे केलं. रेपिचाज प्रकारात बजरंगने पहिल्या फेरीत ताजकिस्तानच्या अब्दुलकासिम फैजीवचा १२-२ तर कांस्यपदकाच्या लढाईत इराणच्या अलीअकबरचा १०-४ असा पराभव केला.

दुसरीकडे विनोद कुमारलाही उजबेगिस्तानच्या इख्तियार नवरोजने ६-३ असं हरवलं. मात्र इख्तियार अंतिम फेरीत पोहचल्यामुळे विनोदला पुन्हा रेपिचाज प्रकारात कांस्यपदकासाठी लढण्याची संधी मिळाली. ज्याचा पुरेपूर फायदा घेत विनोद कुमारने भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर घातली. शुक्रवारी भारताच्या नवज्योत कौरने ६५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावून इतिहासाची नोंद केली होती. आशियाई स्तरावर सुवर्णपदक पटकावणारी नवज्योत पहिली भारतीय महिला ठरली होती. तर रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती साक्षी मलिकने ६२ किलो फ्रिस्टाईल वजनीगटात कांस्यपदक मिळवलं.