पीटीआय, उलनबाटार : अंशू मलिकला आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या ५७ किलो वजनी गटात शुक्रवारी रौप्यपदक मिळाले. याचप्रमाणे राधिकाला (६५ किलो) रौप्य आणि मनीषाला (६२ किलो) कांस्यपदक मिळाले. २० वर्षीय अंशूला अंतिम फेरीत जपानच्या त्सुगुमी साकुराईने चीतपट केले. त्याआधी, वर्चस्वपूर्ण कामगिरीच्या बळावर तिने तिन्ही लढती जिंकल्या. उझबेकिस्तानच्या शोखिदा अखमेडोव्हा आणि सिंगपूरच्या डॅनिले सू चिंग लिम यांना पहिल्या दोन लढतींत नामोहरम केले. मग उपांत्य लढतीत मंगोलियाच्या बोलोटुया खुरेलखूचा पराभव केला. राधिकाने कझाकस्तानच्या डारिगा अ‍ॅबेनविरुद्धच्या अंतिम लढतीत पराभव पत्करला, तर मनीषाचा कोरियाच्या हॅनबिट लीविरुद्धच्या लढतीत पराभव झाला. दरम्यान, ५३ किलो गटात स्वाती शिंदेने दोन्ही लढती गमावल्यामुळे पदकाच्या शर्यतीतून ती बाहेर पडली आहे.